रात्रीच्या कारवाईदरम्यान पानटपरी चालकाकडून हप्ता घेतल्याचा ठपका
marathinews24.com
पुणे – पानटपरी चालकाकडून ३०० रुपयांचा हप्ता घेतल्याप्रकरणी खराडी पोलिस ठाण्यात पोलीस कर्मचाऱ्याला तडकाफडकी निलंबित केले आहे. त्याने ५०० रुपयांची मागणी करून टपरी चालकाकडून ३०० रुपये घेतले. त्यानंतर उर्वरित २०० रुपये द्यावे असे सांगण्यात आल्याचेही चौकशीनंतर समोर आले आहे. पोलीस शिपाई आकाश मुळे असे निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. पोलिस दलाची प्रतिमा मलिन झाल्याचे निरीक्षण निलंबन आदेशात नोंदविले आहे.
‘डिजिटल ॲरेस्टची धमकी; ज्येष्ठाची सव्वा कोटींची फसवणूक – सविस्तर बातमी
पोलिस शिपाई आकाश मुळे हे खडकी ठाण्यात कार्यरत होते. त्यांना रात्रपाळी ड्युटी होती. तेव्हा त्यांच्यावर अनधिकृत आस्थापनांवर पानटपरी, स्टॉलवर रात्री १० ते पहाटे पाचपर्यंत सुरू असल्यास कारवाई करण्याची जबाबदारी होती. यादरम्यान झेन्सॉर रस्त्यावरील स्मोक शॉप उघडे असताना आकाश मुळे हे त्याठिकाणी सव्वा बाराच्या सुमारास तेथे गेले. त्यांनी संबंधित पानटपरी चालकाला सिगारेट विकताना पकडले. त्यांच्याकडील सर्व सिगारेट पिशवीत घालून संबंधित टपरी चालकाला घेऊन ते येत असताना वाटेतच आकाश मुळे यांनी त्यांना सुरुवातीला ५०० रुपये महिना द्यावा लागेल, असे सांगितले. आता किती देऊ शकतो अशी विचारणा देखील केली. त्यावरून चालकाने त्यांना ३०० रुपये देतो आणि नंतर २०० रुपये, देतो असे सांगितले.
तेव्हा अंमलदार आकाश मुळे यांनी ३०० रुपये घेऊन चालकाला सोडून दिले. दरम्यान, रात्रगस्तीवरील महिला पोलिस अधिकाऱ्यांना हा प्रकार समजल्यानंतर त्यांनी याबाबत चालकाला बोलवून त्याचा जबाब नोंदवला. तेव्हा त्याने सर्व घटना सांगितली. त्यानंतर त्यांनी हा प्रकार वरिष्ठांच्या कानावर घातला. परिमंडळ सातचे पोलिस उपायुक्त अबिनाश कुमार यांनी तडकाफडकी पोलिस शिपाई आकाश मुळे यांना पोलिस खात्यातून निलंबित केले.





















