सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – ‘डिजिटल ॲरेस्ट’ची धमकी देऊन मगरपट्टा सिटी भागातील एका ज्येष्ठ नागरिकाची सायबर चोरट्यांनी एक कोटी २८ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यात रीलस्टार संतोष पंडित यांना मध्यरात्री अटक – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ७४ वर्षीय ज्येष्ठ नागरिक हे हडपसरमधील मगरपट्टा सिटीत राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी फिर्यादी ज्येष्ठ नागरिक आणि त्यांच्या पत्नीच्या मोबाइल क्रमांकावर २० ऑगस्ट रोजी संपर्क साधला. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागातील (सीबीआय) अधिकारी असल्याची बतावणी चोरट्यांंनी त्यांच्याकडे केली. काळ्या पैशांच्या व्यवहारात बँक खात्याचा वापर झाला असून, या प्रकरणात अटक करण्यात येणार असल्याची धमकी सायबर चोरट्यांनी त्यांना दिली.
अटक टाळण्यासाठी तातडीने पैसे जमा करावे लागतील, असे सांगून ज्येष्ठ नागरिकाला वेगवेगळ्या बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले. तक्रारदाराने सायबर चोरट्यांच्या बँक खात्यात गेल्या १० दिवसांत एक कोटी २८ लाख रुपये जमा केले. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी तांत्रिक तपास सुरू केला आहे. फिर्यादीने ज्या बँक खात्यात पैसे जमा केले. त्याची माहिती घेण्यात येत असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे तपास करत आहेत. डिजिटल ॲरेस्ट’ची धमकी देऊन ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. ज्येष्ठ नागरिकांनी सायबर चोरट्यांच्या बतावणीकडे दुर्लक्ष करावे, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.
महापालिकेच्या ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
पुणे-कचरा वाहतूक करणाऱ्या महापालिकेच्या ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना हडपसरमधील काळेपडळ भागात घडली. धर्मराज राजाराम जैस्वार (वय ४४, रा. उरळी देवाची, हडपसर-सासवड रस्ता) असे मृत्यूमुखी पडलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत जैस्वार यांचा मुलगा पंकज (वय १८) याने काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धर्मराज जैस्वार हे सुतारकाम करतात. दुचाकीस्वार जैस्वार हे १ ऑगस्ट रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास काळेपडळ परिसरातील जेएसपीएम महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळील रस्त्यावरुन निघाले होते. त्या वेळी महापालिकेच्या कचरा वाहतूक करणाऱ्या ट्रकने दुचाकीस्वार जैस्वार यांना धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या जैस्वार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. पोलीस हवालदार रासकर तपास करत आहेत.





















