तत्कालीन पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्याकडून घेतला चार्ज
marathinews24.com
पुणे – राज्यातील राजकिय पंढरी असलेल्या पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी संदीपसिंह गिल्ल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची पुणे शहर पोलीस दलात पदोन्नतीने अतिरिक्त पोलीस आयुक्तपदी बदली झाली आहे. त्यानुसार संदीपसिंह गिल्ल यांनी शनिवारी ( दि.१७) पंकज देशमुख यांच्याकडून पोलीस अधीक्षक पदाची सुत्रे हातात घेतली.
राज्य गृहविभागाने शुक्रवारी (दि. १६) बदलीचे आदेश दिले होते. त्यानुसार पुणे पोलीस आयुक्तालयात परिमंडळ एकला कार्यरत असलेले पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल्ल यांनी पदभार स्वीकारला. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी पुणे ग्रामीण पोलीस दलात अधीक्षकपदी बदली करण्यात आली होती. मात्र, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांचा कार्यकाळ पूर्ण न झाल्याने प्रशासकीय सेवा प्राधिकरणात (मॅटमध्ये) धाव घेतली होती. त्यांनी कार्यकाळ पूर्ण करण्याची विनंती केली होती.
त्यानुसार देशमुख यांनी कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर त्यांची बदली केली. त्यानंतर गिल्ल यांना पोलीस उपायुक्त पदावरुन कार्यमुक्त करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शनिवारी (दि.१७) दिले. त्यानुसार आता ते लवकरच पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकपदाची सूत्रे स्विकारली आहेत. पोलीस उपायुक्त असलेल्या गिल्ल यांनी गणेशोत्सवातील बंदोबस्त, अनेक महत्त्वाच्या कार्यक्रमांचा बंदोबस्त यशस्वीरित्या पार पाडला. विविध सार्वजनिक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी सातत्याने साधलेल्या संवादामुळे ते लोकप्रिय अधिकारी ठरले आहेत. तर पंकज देशमुख यांनाही पुणे जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यावर भर दिला होता. अनेक गंभीर गुन्ह्यांची उकल करण्यात त्यांचा हातखंडा होता.