घोरपडीतील नियोजित उड्डाणपुलाजवळ दुर्घटना
marathinews24
मराठीन्यूज२४- पुणे : रेल्वेच्या नियोजित उड्डाणपुलाजवळ खड्डयात साचलेल्या पाण्यात पडून बुडाल्याने ९ वर्षीय् शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. शुक्रवारी शाळेतून निघालेला मुलगा बेपत्ता झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी तक्रार दिली होती. शनिवारी सायंकाळी शाळकरी मुलाचा मृतदेह घोरपडीतील रेल्वे उड्डाणपुलाजवळील खड्डयात साचलेल्या पाण्यात सापडला. अग्निशमन दल आणि मुंढवा पोलिसांनी खड्डयातील पाणी मोटरपंपाद्वारे बाहेर काढून मुुलाचा मृतदेह बाहेर काढला. क्रिश सुभाष अंगरकर (वय ९, रा. खान रोड, गुरुद्वाराजवळ, लष्कर) असे मृत्यमुुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रिश हा घोरपडी परिसरातील शाळेत चौथीत शिक्षण घेत होता. त्याचा मोठा भाऊ याच परिसरात शाळेला आहे. शाळा सुटल्यानंतर दोघेही एकत्र घरी जायचे. शुक्रवारी (२८ मार्च) शाळा सुटल्यानंतर क्रिश भावाच्या शाळेत गेला नाही. त्यामुळे त्याचा भाऊ एकटाच घरी परतला. क्रिश घरी न परतल्याने कुटुंबीयाने त्याच्या मित्रांकडे शोध घेतला. शुक्रवारी रात्री उशीरापर्यंत त्याचा ठावठिकाणा लागला नाही. त्यानंतर त्याच्या क्रिश बेपत्ता झाल्याची तक्रार शनिवारी (२९ मार्च) दुपारी वानवडी पोलीस ठाण्यात दिली. वानवडी आणि मुंढवा पोलिसांनी त्याचा शोध घेतला. मात्र, क्रिश आढळून आला नाही.

घोरपडी परिसरात नियोजित रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. रेल्वे फाटक परिसरातील कोंडी दूर करण्यासाठी या भागात उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. महापालिकेकडून उड्डाणपुलाचे काम केले जात आहे. हे काम एका कंपनीला देण्यात आले आहे. उड्डाणपूलाच्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात मुलगा पडल्याची माहिती लहान मुलांनी पोलिसांनी दिली. त्यानंतर शनिवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अग्निशमन दल आणि पोलिसांचे पथकांनी तपासाला गती दिली. साचलेल्या पाण्यात क्रिश पडल्याचे लक्षात आल्यानंतर मोटारपंपांचा वापर करुन पाणी काढले. पोलिसांनी त्वरीत क्रिशला रुग्णालयात दाखल केले. नाकातोंडात पाणी शिरल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले
ठेकेदाराविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
घोरपडीतील रेल्वे उड्डाणपुलाचे काम कंपनीला दिले आहे. शाळकरी मुलाचा मृत्यू खड्डयात साचलेल्या पाण्यात बुडून झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. दुर्घटनेस जबाबदार ठरल्याप्रकरणी संबंधित काम करणार्या ठेकेदाराविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा रविवारी दाखल केला, अशी माहिती मुंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीळकंठ जगताप यांनी दिली.
साचलेल्या पाण्यात क्रिशचे दप्तर
उड्डाणपुलाच्या कामासाठी खोदलेल्या खड्याभोवती पाच ते सहा फूट उंचीचे लोखंडी कठडे उभारले आहे. कठड्याजवळ एक फूट जागा असून, त्या जागेतून क्रिश तिथे गेला असावा. उत्सुकतेपोटी डोकावून पाहत असताना तो खड्डयात तोल जाऊन पडल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. क्रिश खड्डयात साचलेल्या पाण्यात बुडाल्याचे उघडकीस आल्यानंतर त्याची आई आणि वडिलांना अश्रृ अनावर झाले. साचलेल्या पाण्यात क्रिशचे दप्तर पडले होते. पाण्यात पुस्तके तरंगत होती. हे दृश्य पाहून त्यांना अश्रृ अनावर झाले.