श्रीमंत दगडूशेठ मंदीर, आरएसएस कार्यालय, शनिवारवाडा परिसरात सुरक्षा रक्षक तैनात
marathinews24.com
पुणे – भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातही महत्वाच्या ठिकाणांसह नामांकित श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदीर परिसरातील सुरक्षितेत वाढ करण्यात आली आहे. शहरातील विविध भागात स्थानिक पोलिसांसह खासगी सुरक्षा रक्षकांची संख्या वाढविली असून, जागोजागी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने रात्रगस्तीतही वाढ केली असून, प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महत्वाच्या ठिकाणांवर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. प्रामुख्याने संशयास्पद ठिकाणांवर बॉम्ब शोधक व नाशक पथकाकडून परिसर पिंजून काढला जात आहे.
केंद्र व राज्य सरकारच्या सुचनेनुसार युद्धसदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर दोनच दिवसांपुर्वी (७ मे) सर्वच यंत्रणांनी मॉकड्रील केले होते. त्यावेळी सुरक्षा यंत्रणासह प्रशासकीय विभागाने आपआपल्या विभागाच्या तयारीची उजळणी केली होती. दरम्यान, हिंदुस्थान आणि पाकिस्तामध्ये युद्धाला सुरूवात झाली असून, खबरदारीचा उपाय म्हणून पुण्यातही महत्वाच्या स्थळांसह नामांकित दगडूशेठ हलवाई गणपर्ती मंदीर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यालय, शनिवारवाडा, एनडीए परिसर, विविध केंद्रीय आणि राज्यस्तरीय कार्यालय परिसरात स्थानिक पोलिसांकडून सुरक्षा वाढविण्यात आली आहे. संबंधित कार्यालयांनीही खाजगी सुरक्षा वाढविण्यास प्राधान्य दिल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, कायदा सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग वाढविण्यता आले आहे.
मंदिर परिसराला छावणीचे स्वरूप, आजूबाजूलाही लक्ष
भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पुण्यातील नामांकित श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदीर परिसरातही मोठ्या प्रमाणात सुरक्षा वाढविण्यात आली आहे. दरम्यान, दोनच दिवसापुर्वी परिसरात सुरक्षा यंत्रणेकडून मॉकड्रील केले होते. त्यावेळी परिसरातील गल्ली-बोळासह इनगेट- आउट गेटचीही पाहणी केली होती. विश्रामबाग, फरासखाना पोलिसांसह केंद्रीय तपास यंत्रणाकडून सुरक्षिततेचा आढावा घेण्यात आला. दरम्यान, गुरूवारी (दि. ८) मध्यरात्रीपासूनच मंदीर परिसराला पोलिसांसह खासगी सुरक्षा रक्षकांनी वेढा दिला आहे. सुरक्षा यंत्रणेकडून भाविकांसह आजूबाजूच्या हालचालींवर लक्ष केंद्रीते केले आहे.
भाविकांच्या पिशव्यांची तपासणी, दर्शनरांग वेगाने
केंद्र आणि राज्य सरकारच्या सुचनेनुसार पोलिसांकडून महत्वाच्या ठिकाणांसह मंदीर परिसरात अतिरिक्त सुरक्षा तैनात केली आहे. प्रामुख्याने मध्यवर्ती दगडूशेठ हलवाई मंदीराजवळील परिसरावर लक्ष केंद्रीत केले आहे. पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरात गस्त वाढवली असून, बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी येणार्या भाविकांच्या पिशव्यांची कसून तपासणी केली जात आहे. त्यासोबतच दर्शनरांगेत गर्दी होणार नाही. दर्शनाचा वेग वाढविण्यात आला असून, सुरक्षितेच्या कारणास्तव भाविकांना दर्शनासाठी मंदिरात जास्त वेळ थांबू दिले जात नाही.