जेष्ठाची रखवालदाराकडून २४ लाखांची फसवणूक, रखवालदारासह दोघांना बेड्या
marathinews24
मराठीन्यूज २४ पुणे– सोसायटीमध्ये एकट्या राहणार्या जेष्ठाची रखवालदारानेच फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. तब्बल २४ लाख ४८ हजार रुपयांची फसवणूकीप्रकरणी. हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी रखवालदारासह साथीदाराला अटक केली. इफ्तेखार रहीमखान पठाण (वय ३१, रा. गोवंडी, मुंबई), मोहम्मद हनीफ मोहम्मद अफसर (वय ५२, रा. म्हसोबा मंदिराजवळ, काळेपडळ, हडपसर, मूळ रा. पातूर, जि. अकोला) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला नोकरीनिमित्त बंगळुरूत राहायला असून, त्यांचे वडील हडपसर भागातील सोसायटीत राहायला आहेत. सोसायटीमध्ये एकट्या राहणार्या ज्येष्ठ नागरिकाशी रखवालदार पठाण याने ओळख वाढवून त्यांच्या बँक खात्याची माहिती घेतली. बँक खात्याचा माहिती घेतल्यानंतर त्याने परस्पर खात्यातून २४ लाख ४८ हजार रुपयांची रक्कम ऑनलाइन पद्धतीने काढून घेतली. दरम्यान, खात्यातून रक्कम काढून घेतल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) नीलेश जगदाळे, संदीप राठोड, गायत्री पवार, तेजस पांडे यांनी तपास सुरू केला. तपासात ज्येष्ठ नागरिकाच्या बँक खात्यातील रक्कम कोणत्या खात्यात वळविण्यात आली, याची माहिती घेतली. तपासात संबंधित रक्कम रखवालदार पठाण आणि अफसरच्या खात्यात वळविण्यात आल्याचे स्पष्ट झाले. रकमेच्या फेरफारनंतर पठाण सोसायटीतील काम सोडून पसार झाला होता. तपासात पठाण आणि अफसर एकमेकांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर दोघांना अटक करण्यात आली. एकटे राहणार्या ज्येष्ठांनी घरकामास ठेवलेल्या अनोळखींवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरमुळे लागली आग- सविस्तर बातमी
दोघेही आरोपी नातलग
आरोपी पठाण हा अफसर याचा मेहुणा असून, ज्येष्ठ नागरिक घरात एकटे राहत असल्यामुळे रखवालदार पठाणला काम सांगत होते. ते त्याला खरेदीसाठी पेैसे देत होते. पठाणने त्यांना मदत करण्याचा बहाणा करुन जेष्ठाच्या बँक खात्याची गोपनीय माहिती घेतली. बँक खात्यातून ऑनलाइन पद्धतीने रक्कम काढून घेतल्याचे उघडकीस आले. आरोपींना ३१ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. पोलीस निरीक्षक नीलेश जगदाळे तपास करत आहेत.