समारंभ स्थळाची क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली पाहणी
Marathinews24.com
पुणे – शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने आयोजित शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराचे म्हाळुंगे बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडा संकुलातील बॅडमिंटन सभागृहात शुक्रवारी (दि. १८) वितरण होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी समारंभस्थळी भेट देऊन तयारीची पाहणी केली. पुरस्कार सोहळा सर्वांसाठी खुला असून अधिकाधिक क्रीडा प्रेमींनी कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन भरणे यांनी केले. क्रीडा आयुक्त हिरालाल सोनवणे, सहसंचालक सुधीर मोरे, उपसंचालक सुहास पाटील, पोलीस अधिकारी उपस्थित होते.
पुरस्कार वितरण राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते होणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजीत पवार, केंद्रिय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ उपस्थित राहणार आहे. यावेळी मंत्री भरणे यांनी व्यासपीठ व्यवस्था, बैठक व्यवस्था, प्रवेशद्वार, पुरस्कारीर्थींची निवास व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था आदींविषयी माहिती घेतली.
वडिलांच्या स्मृती जागवण्यासाठी सिडनीहून गाठले गाव – सविस्तर बातमी
शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कारासह उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक- जिजामाता पुरस्कार, खेळाडूंसाठीचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा साहसी पुरस्कार ,दिव्यांग खेळाडूंचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार असे ५ प्रकारचे पुरस्कार देण्यात येणार आहेत. जीवन गौरवसाठी ५ लाख, शिवछत्रपती पुरस्करासाठी ३ लाख रूपये व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.