विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू; वसतिगृहात आढळला मृतदेह
Marathinews24.com
पुणे – शहरातील नामांकित फर्ग्युसन महाविद्यालयात विधी अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणारा विद्यार्थी वसतिगृहात मृतावस्थेत सापडल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे. भूषण ढुमणे (वय १९, मूळ रा. वर्धा) असे मृतावस्थेत सापडलेल्या तरुणाचे नाव आहे.
बांधकाम व्यावसायिकांना गौणखनिज उत्खननाची परवानगी घेणे आवश्यक
भूषण फर्ग्युसन महाविद्यालयाच्या आवारातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालयात शिक्षण घेत होता. शुक्रवारी सकाळी महाविद्यालयाच्या आवारातील वसतिगृहात भूषण बेशुद्धावस्थेत पडल्याचे लक्षात आले. वसतिगृहातील विद्यार्थ्यांने याबाबतची महिती महाविद्यालयीन प्रशासनाला दिली. त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच डेक्कन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. वसतिगृहातील खोलीत औषधाच्या गोळ्यांचे पाकिट सापडले आहे. तेथे वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याची चिठ्ठी पोलिसांना सापडली आहे.
भूषणचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्युमागचे निश्चित कारण समजेल. पोलिसांकडून भूषणच्या मित्रांची चौकशी करण्यात आली. लवकरच परीक्षा सुरू होणार होती, अशी माहिती मित्रांनी दिली. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूमागचे निश्चित कारण समजेल. याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आले आहे, अशी माहिती डेक्कन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशा निंबाळकर यांनी दिली.