गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सिंहगड रोड पोलिसांची कारवाई
marathinews24.com
पुणे – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी गस्त घालत असलेल्या सिंहगड रोड पोलिसांच्या पथकाने रेकॉर्डवरील आरोपीकडून गावठी पिस्तुल आणि जिवंत काडतूस जप्त केले. सिद्धेश सुरेश पवार (वय ३१, रा. बिल्डिंग क्रमांक ४ बी, पहिला मजला, विश्रांतिनगर, हिंगणे खुर्द, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सिंहगड रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत ११ सप्टेंबर रोजी तपास पथकाचे पोलिस उपनिरीक्षक भूपेश साळुंके आणि कर्मचारी गुन्हे प्रतिबंधक गस्त घालत होते. त्यावेळी पोलिस अंमलदार प्रफुल्ल चव्हाण आणि युवराज कांबळे यांना संशयित व्यक्तीबाबत माहिती मिळाली होती.
पुण्यात सराइतांविरुद्ध कारवाईचा बडगा – सविस्तर बातमी
काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि पांढऱ्या रंगाची पँट घातलेला एक व्यक्ती विश्रांतिनगरकडून जनता वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्यावर, शंकर मंदिराजवळ हिंगणे खुर्द परिसरात अग्निशस्त्र घेऊन थांबला असल्याची त्यांना माहिती मिळाली. माहितीची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून खातरजमा करून कारवाईचे आदेश मिळाल्यानंतर पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. वर्णनाशी मिळताजुळता इसम तेथे आढळून आल्यानंतर त्याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. सुरुवातीला त्याने समाधानकारक माहिती न दिल्याने पोलिसांनी अंगझडती घेतली. त्यावेळी त्याच्याकडून अंदाजे ४० हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तुल आणि जिवंत काडतूस असा ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.
याप्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात आर्म्स अॅक्ट कलम ३(२५) तसेच महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ३७(१), १३५ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनय पाटणकर, पोलीस निरीक्षक समीर गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार उत्तम तारू, तानाजी सागर, आण्णा केकाण, सतीश मोरे, विकास बांदल, राहुल ओलेकर, सागर शेडगे, विनायक मोहिते शिरीष गावडे यांनी केली.





















