कर्जमुक्तीच्या घोषणेसह शेतकऱ्यांसाठी दिलासा
marathinews24.com
पुणे – राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्तीची घोषणा करत दिलासा दिला असून, त्याचबरोबर शेतीचा उत्पादन खर्च कमी करून शाश्वत शेतीला चालना देणाऱ्या योजनांची प्रभावी अंमलबजावणीही सुरू ठेवली आहे. त्यापैकी ‘मागेल त्याला सौर कृषीपंप’ ही योजना पुणे जिल्ह्यात यशस्वी ठरत असून, आतापर्यंत ५ हजार ६५४ शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा आणि मोफत वीज उपलब्ध होत असून सिंचन अधिक सुरक्षित, सुलभ आणि किफायतशीर झाले आहे.
गिरीप्रेमी संस्थेतील ११ महिला गिर्यारोहक मेंटोक कांग्री मोहिमेसाठी पुण्यातून रवाना – सविस्तर बातमी
जिल्ह्यात आंबेगाव तालुक्यातील १८८, बारामती ६३५, भोर २३, दौंड ६५०, हवेली १८२, इंदापूर ७३८, जुन्नर ४२९, खेड २०१, मावळ १०, मुळशी २२, पुरंदर ५११, शिरूर १,९८४ आणि वेल्हा ११ अशा एकूण ५ हजार ६५४ शेतकऱ्यांना सौर कृषीपंपाचा लाभ मिळाला आहे.
कर्जमुक्तीची घोषणा, नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन, सिंचन सुविधा, पीक विमा, बाजारपेठ उपलब्धता आणि सौर कृषीपंप यांसारख्या योजनांमुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करून त्यांचे उत्पन्न वाढविण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे शेती अधिक शाश्वत आणि तंत्रज्ञानाधिष्ठित करण्यावर भर देण्यात येत आहे.
सौर कृषीपंपासाठी अनुसूचित जाती-जमातींच्या लाभार्थ्यांना केवळ ५ टक्के लाभार्थी हिस्सा भरावा लागतो, तर इतर प्रवर्गातील शेतकऱ्यांना १० टक्के हिस्सा भरून पंप उपलब्ध होतो. उर्वरित ९५ व ९० टक्के रक्कम शासनाकडून अनुदान स्वरूपात संबंधित संस्थेला दिली जाते.
सौर कृषीपंपामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी रात्री-अपरात्री शेतात जाण्याची गरज राहत नाही. त्यामुळे जंगली श्वापदांचा धोका कमी झाला असून रोहित्र जळणे, कमी व्होल्टेज किंवा वीजपुरवठ्यातील अडचणी यांसारख्या समस्यांपासूनही मोठ्या प्रमाणात दिलासा मिळत आहे. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनविण्यासाठी प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि विविध योजनांद्वारे आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जात आहे. कर्जमुक्तीच्या घोषणेसह अशा पूरक योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे आणि शेती क्षेत्राचा सर्वांगीण विकास साधणे, यासाठी राज्य शासन आणि जिल्हा प्रशासन कटिबद्ध असल्याची माहिती महावितरण कार्यालयाने दिली आहे.






















