थ्री इडियट्स’मधील प्रेरणास्थान ते देशातील पर्यावरण आणि शिक्षण सुधारणा चळवळीचा चेहरा
marathinews24.com
पुणे : (रेवण कोळेकर) – दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) निट पेपर फुटी प्रकरणी आंदोलनामुळे पुन्हा एकदा सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) हे नाव देशभर चर्चेत आले आहे. अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे की, नक्की सोनम वांगचुक कोण आहेत आणि त्यांचे कार्य काय आहे? तसेच कॉकरोच जनता पार्टी मध्ये अभिजीत दिपके यांच्या सोबत ते का आंदोलन करत आहेत? हे प्रश्न नक्कीच तुम्हाला पडले असतीलच…. तर सोनम वांगचुक शिक्षण, पर्यावरण संवर्धन आणि लडाखच्या हक्कांसाठी सातत्याने लढणारे सोनम वांगचुक हे भारतातील प्रसिद्ध अभियंता तसेच शिक्षणतज्ज्ञ, नवोपक्रमक आणि पर्यावरण कार्यकर्ते म्हणून देखील ओळखले जातात.
‘भक्ती विठ्ठलाची… सेवा आरोग्याची’ : ५२ हजारांहून अधिक वारकऱ्यांना आरोग्य सेवेचा लाभ – सविस्तर बातमी
सोनम वांगचुक यांचा जन्म १ सप्टेंबर १९६६ रोजी लडाखमधील अल्ची गावात झाला. लहानपणी त्यांच्या गावात शाळा नसल्यामुळे त्यांचे प्राथमिक शिक्षण आईनेच घरात दिले. पुढे त्यांनी श्रीनगर येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (NIT) मधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी लडाखमधील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण व्यवस्था सुधारण्याचे काम हाती घेतले.
१९८८ मध्ये त्यांनी SECMOL (Students Educational and Cultural Movement of Ladakh) या संस्थेची स्थापना केली. ही संस्था ग्रामीण आणि डोंगराळ भागातील विद्यार्थ्यांना कौशल्याधारित, व्यवहार्य आणि पर्यावरणपूरक शिक्षण देण्यासाठी कार्यरत आहे. त्यांच्या या कार्याची देश-विदेशात मोठी दखल घेण्यात आली आहे. प्रसिद्ध हिंदी चित्रपट 3 Idiots मधील ‘फुन्सुख वांगडू’ हे पात्र मोठ्या प्रमाणात सोनम वांगचुक यांच्या जीवनातून प्रेरित असल्याचे मानले जाते.
सोनम वांगचुक यांनी पर्यावरण संरक्षणासाठीही अनेक अभिनव प्रयोग केले आहेत. हिमालयीन भागातील पाण्याची टंचाई कमी करण्यासाठी त्यांनी विकसित केलेली ‘आइस स्तूपा’ (Ice Stupa) ही संकल्पना जगभर गाजली. या कृत्रिम बर्फ स्तूपांमुळे उन्हाळ्यात वितळणारे पाणी शेतीसाठी उपलब्ध होते. या नवकल्पनेसाठी त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले असून २०१८ मध्ये त्यांना प्रतिष्ठेचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला.
लडाखला संवैधानिक हक्क आणि पर्यावरणाचे संरक्षण मिळावे यासाठी वांगचुक यांनी गेल्याच वर्षी सप्टेंबर २०२५ मध्ये आमरण उपोषण केले होते. लेहमध्ये आंदोलनादरम्यान आंदोलकांनी हिंसक कृत्य केल्याचा आरोप केला. आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसेच्या प्रकरणात सोनम वांगचुक यांना अटक देखोल करण्यात आली होती.
सध्या दिल्लीतील जंतर-मंतर येथे अभिजित दिपके यांच्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनात ते २८ जून पासून सामील झाले, त्यामुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत. आज त्यांच्या आंदोलनाचा १६ वा दिवस असल्याने त्यांच्या प्रकृतीबाबत ही चिंता व्यक्त केली जात आहे. विविध राजकीय पक्षांचे नेते, सामाजिक कार्यकर्ते त्यांना उपोषण सोडण्याचे आवाहन करत आहेत परंतु मंत्री धर्मेंद्र प्रधान जोपर्यंत राजीनामा देत नाहीत तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असे सांगितले जात आहे.
Sonam Wangchuk हे केवळ आंदोलन करणारे कार्यकर्ते नसून शिक्षण, पर्यावरण आणि शाश्वत विकास यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न करणारे दूरदृष्टीचे विचारवंत म्हणून त्यांची ओळख आहे. लडाखसारख्या दुर्गम भागातून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज राष्ट्रीय पातळीवर पोहोचला असून देशातील तरुणांसाठी ते प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व मानले जातात.
























