Breking News
जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे बारामती तालुक्यात प्रशासनाच्यावतीने स्वागतमानाच्या १० पालख्यांसोबतच्या दिंड्यांना प्रति दिंडी २० हजार प्रमाणे २ कोटी ८० लाखांचे अनुदान मंजूरमोटारीची काच फोडून रोकड चोरी; परप्रांतीय चोरट्यांची टोळी गजाआडएसआयआर कार्यक्रमाचा केंद्रीय उप निवडणूक आयुक्तांकडून आढावा‘भक्ती विठ्ठलाची… सेवा आरोग्याची’ : ५२ हजारांहून अधिक वारकऱ्यांना आरोग्य सेवेचा लाभजेजुरीतील दुर्घटनेनंतर वारकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; प्रमुख तीर्थक्षेत्रांच्या मार्गांवर सक्षम आरोग्य यंत्रणा उभारण्याची आमदार सत्यजीत तांबे यांची मागणीपाकिस्तानातील गुंड शहजाद भट्टीच्या संपर्कातील ६६ जणांची चौकशीभक्तीच्या महासागरात प्रदर्शन, चित्ररथ व कलापथकांच्या माध्यमातून जनतेशी ‘संवाद वारी’संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात ‘संवाद वारी’ प्रदर्शनSwami Govinddev Giri Maharaj : राजीनामा देणार नाही, ट्रस्टसोबत उभे राहण्याची वेळ-स्वामी गोविंददेव गिरी महाराज

‘भक्ती विठ्ठलाची… सेवा आरोग्याची’ : ५२ हजारांहून अधिक वारकऱ्यांना आरोग्य सेवेचा लाभ

'भक्ती विठ्ठलाची... सेवा आरोग्याची' : ५२ हजारांहून अधिक वारकऱ्यांना आरोग्य सेवेचा लाभ

७९३ रुग्णांवर आंतररुग्ण उपचार; १३७ जणांना पाठविले पुढील उपचारासाठी

marathinews24.com

पुणे – आषाढी पालखी सोहळा २०२६ दरम्यान वारकरी बांधवांची वारी सुरक्षित, निरोगी आणि सुखकर व्हावी या उद्देशाने पुणे जिल्हा परिषद आरोग्य विभागाने उभारलेली सर्वंकष आरोग्य यंत्रणा प्रभावीपणे कार्यरत असून, ‘भक्ती विठ्ठलाची… सेवा आरोग्याची’ ही संकल्पना पालखी मार्गावर प्रत्यक्षात साकार झाली आहे. पालखी मार्गावरील प्रत्येक मुक्कामस्थळी वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, आरोग्य कर्मचारी, रुग्णवाहिका, औषधसाठा, आपत्कालीन उपचार साहित्य, अन्नसुरक्षा पथके तसेच पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेवर देखरेख ठेवणारी यंत्रणा चोवीस तास कार्यरत ठेवण्यात आली आहे.

जेजुरीतील दुर्घटनेनंतर वारकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; प्रमुख तीर्थक्षेत्रांच्या मार्गांवर सक्षम आरोग्य यंत्रणा उभारण्याची आमदार सत्यजीत तांबे यांची मागणी – सविस्तर बातमी 

दिनांक ४ जुलै ते १२ जुलै २०२६ या कालावधीतील एकत्रित अहवालानुसार पालखी मार्गावरील विविध आरोग्य केंद्रांमध्ये एकूण ५२ हजार ४२९ वारकऱ्यांची बाह्यरुग्ण तपासणी करण्यात आली. त्यापैकी ७९३ रुग्णांना आंतररुग्ण उपचार देण्यात आले, तर अधिक उपचारांची आवश्यकता असलेल्या १३७ रुग्णांना उच्चस्तरीय वैद्यकीय उपचारासाठी पुढे पाठविण्यात आले.

आजारनिहाय उपचारांमध्ये तापाचे ६ हजार ७३९, सर्दी-अंगदुखीचे ३ हजार ३७४, उच्च रक्तदाबाचे १ हजार ४००, मधुमेहाचे १ हजार १६२, किरकोळ अतिसाराचे ४४४, श्वानदंशाचे १२२, सर्पदंशाचे २, रस्ते अपघातातील ६२, हृदयविकाराचे ८ तसेच इतर विविध आजारांवरील ३४ हजार ३९१ रुग्णांवर उपचार करण्यात आले. आवश्यक औषधे, आपत्कालीन सेवा आणि रेफरल सुविधा वेळेवर उपलब्ध करून देण्यात आल्या.

संत ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरू संत तुकाराम महाराज तसेच संत सोपानकाका पालखी मार्गावर आरोग्य सेवा अखंड सुरू ठेवण्यात आली. साथीच्या आजारांवर सतत देखरेख, पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तपासणी, अन्नसुरक्षा आणि आपत्कालीन वैद्यकीय प्रतिसाद यावर विशेष भर देण्यात आला.

आरोग्य विभागाच्या तत्परतेचे उल्लेखनीय उदाहरण म्हणून दिवे घाट परिसरात हृदयविकाराचा झटका आलेल्या ७० वर्षीय ज्येष्ठ वारकऱ्याला कार्यरत वैद्यकीय पथकाने वेळेवर सीपीआर (CPR) देत जीवदान दिले. या घटनेमुळे पालखी मार्गावरील आरोग्य यंत्रणेची सज्जता, प्रशिक्षण आणि संवेदनशीलता अधोरेखित झाली.

दरम्यान, श्री संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यादरम्यान बेलसर फाटा (ता. पुरंदर) येथे झालेल्या दुर्दैवी रस्ते अपघातात वासकर महाराज (कसबे डिग्रज) दिंडीतील नंदा बाबुराव पवार (वय ६०), माधवी राजाराम सलगरे (वय ५५) आणि राजश्री शंकर भोसले (वय ५५) या तीन वारकरी महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

या अपघातात गंभीर जखमी झालेल्या श्रीमती शांता शिवाप्पा अलकोपर (वय ७०) यांना छातीस गंभीर दुखापत, बरगड्यांना फ्रॅक्चर व हेमोथोरॅक्स झाल्याने पुढील उपचारासाठी ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे येथे दाखल करण्यात आले असून ट्रॉमा अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. इंटरकॉस्टल ड्रेनेज प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.

तसेच कासाबाई जगन्नाथ गस्ते, लक्ष्मी विठ्ठल गडदे, अक्काताई बबन कोळी, शैलजा दिनकर जगताप, गीताबाई सदाशिव हंकारे आणि मंगल विलास पाटील या जखमी वारकऱ्यांवर आनंदी हॉस्पिटल, जेजुरी येथे उपचार सुरू आहेत.

एमएच-४३ ई-४९०८ क्रमांकाच्या ट्रकचा अपघातात सहभाग असून वाहनचालक बालाजी एकनाथ डक (रा. पिंपळगाव, जि. नांदेड) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संबंधित वाहन ताटे महाराज भुसेकर दिंडी यांच्याशी संबंधित असल्याची माहिती असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

याबाबत जिल्हा परिषद अध्यक्ष विरधवल जगदाळे यांनी, लाखो वारकऱ्यांच्या आरोग्य संरक्षणासाठी पुणे जिल्हा परिषद आरोग्य विभागाने अत्यंत नियोजनबद्ध व तत्पर सेवा दिल्याचे सांगून या सेवाकार्यात योगदान देणाऱ्या सर्व वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, आरोग्य कर्मचारी, रुग्णवाहिका पथके तसेच संबंधित विभागांचे अभिनंदन केले आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील (भा.प्र.से.) यांनी पालखी सोहळ्यासारख्या व्यापक सार्वजनिक उपक्रमात सूक्ष्म नियोजन, आंतरविभागीय समन्वय आणि तात्काळ प्रतिसाद या त्रिसूत्रीच्या आधारे प्रभावी आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आल्याचे नमूद केले.

सभापती (बांधकाम व आरोग्य) सौ. दिपाली दीपक हुलावळे यांनी वारकऱ्यांच्या सेवेसाठी समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांनी पालखी मार्गावरील प्रत्येक आरोग्य केंद्रात मनुष्यबळ, औषधसाठा, रुग्णवाहिका आणि आवश्यक वैद्यकीय उपकरणांची उपलब्धता सुनिश्चित करण्यात आल्याचे सांगितले.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे यांनी पालखी मार्गावरील प्रत्येक मुक्कामस्थळी प्रशिक्षित वैद्यकीय पथके, औषधसाठा, आपत्कालीन उपचार साहित्य आणि सक्षम रेफरल व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती दिली.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास देवमाने यांनी प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा, तातडीचे उपचार आणि प्रभावी रेफरल व्यवस्थेमुळे वारकऱ्यांना वेळेत आरोग्य सेवा उपलब्ध होत असून पुढील प्रवासातही ही सेवा अखंड सुरू राहणार असल्याचे सांगितले.

वारकरी बांधवांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देत पुणे जिल्हा परिषद आरोग्य विभागाने केलेल्या प्रभावी नियोजनामुळे यंदाचा आषाढी पालखी सोहळा अधिक सुरक्षित, सुव्यवस्थित आणि आरोग्यदायी वातावरणात पार पडत असल्याचे चित्र पालखी मार्गावर पाहायला मिळत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×