महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये आतापर्यंत ९ हजार ८०२ महिला व बालकांनी विविध तपासण्या व उपचारांचा घेतला लाभ
marathinews24.com
पिंपरी – भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत “स्वस्थ नारी, सशक्त परिवार” या अभियानाला पिंपरी चिंचवड शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. १७ सप्टेंबरपासून हे अभियान सुरू झाले असून दोन दिवसांमध्ये या अभियानांतर्गत महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये ९ हजार ८०२ महिला व बालकांनी विविध तपासण्या व उपचारांचा लाभ घेतला आहे.
पराभवाचा वचपा काढण्यासाठी राष्ट्रवादीची तयारी सुरू, अजित पवारांचे दौरे वाढले – सविस्तर बातमी
महिलांचे आरोग्य व सक्षमीकरण हे कुटुंब, समाज आणि देशाच्या प्रगतीचे प्रमुख केंद्रस्थान असल्याने भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत “स्वस्थ नारी, सशक्त परिवार” हे विशेष राष्ट्रीय अभियान १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत देशभर राबविण्यात येत आहे. हे अभियान महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांच्या अधिपत्याखाली व अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अंजली ढोणे यांच्या नेतृत्वात पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्व रुग्णालये व दवाखान्यांमध्ये राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिरांमध्ये गेल्या दोन दिवसांत ९ हजार ८०२ महिला व बालकांनी विविध तपासण्या व उपचारांचा लाभ घेतला आहे.
या शिबिरांतर्गत महिलांसाठी, किशोरींसाठी व बालकांसाठी विविध आरोग्यविषयक सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. यामध्ये ०-५ वयोगटातील मुलांसाठी लसीकरण, किशोरवयीन मुलींसाठी तपासणी व समुपदेशन, उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग, क्षयरोग व ॲनिमिया तपासणी, गर्भवती महिलांची तपासणी, हिमोग्लोबिन तपासणी, पोषणविषयक समुपदेशन व लसीकरण यांचा समावेश आहे. तसेच किशोरींसाठी मासिक पाळी व पोषणविषयक सत्रांचे आयोजन करण्यात आले. याशिवाय आयुष्मान भारत डिजिटल मिशन, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व आयुष्मान वय वंदना कार्ड यांचे वितरण, निक्षय मित्र स्वयंसेवकांची नोंदणी व क्षयरुग्णांना पोषण आहारासाठी दत्तक घेण्यास प्रोत्साहन देण्यात आले. आवश्यकतेनुसार रुग्णांना रक्त, लघवी, सोनोग्राफी, एक्स-रे आदी तपासण्यांसाठी तज्ज्ञांकडे मार्गदर्शन करण्यात आले.
महापालिकेच्या सर्व रुग्णालये व दवाखान्यांमध्ये हे अभियान २ ऑक्टोबर २०२५ पर्यंत राबविले जाणार आहे. त्यामुळे महिलांनी व किशोरींनी आरोग्यसेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या वैद्यकीय विभागामार्फत करण्यात आले आहे. महिलांचे आरोग्य हेच कुटुंब आणि समाजाच्या आरोग्याचा आधार आहे. या अभियानाद्वारे महिलांना सर्वसमावेशक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. नागरिकांनी या शिबिरांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेऊन आपले आरोग्य तपासून घ्यावे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. – शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महापालिका
या अभियानाद्वारे महिला व बालकांसाठी आवश्यक त्या सर्व आरोग्य सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात येत आहेत. विशेषत: किशोरी व गर्भवती महिलांसाठी तपासण्या, समुपदेशन व पोषण मार्गदर्शन ही या शिबिरांची महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. २ ऑक्टोबरपर्यंत ही शिबिरे दररोज सुरू राहतील, त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा. – डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, पिंपरी चिंचवड महापालिक





















