उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडे कारवाईची मागणी
marathinews24.com
मुंबई – राज्यभरात विक्री होणाऱ्या कुंकवामध्ये रसायनांची व रंगांची भेसळ होत असल्याने महिलांच्या त्वचेस धोका निर्माण झाला आहे, असे निदर्शनास आणत विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. नरहरी झिरवाळ यांच्याकडे तत्काळ कारवाईची मागणी केली आहे.
पुणे शहरात चोरट्यांचा उच्छाद.. मोबाईल, दागिने, ऐवजांची चोरी सुरुच – सविस्तर बातमी
दैनिक ‘लोकमत’च्या २४ जूनच्या अंकात प्रकाशित झालेल्या बातमीचा संदर्भ देत त्यांनी कुंकवामध्ये असलेल्या घातक पदार्थांमुळे त्वचेवर खाज, ॲलर्जी, डाग आणि काही वेळा कर्करोग होण्याची शक्यता निर्माण होत असल्याचे नमूद केले आहे.
या पार्श्वभूमीवर डॉ. गोऱ्हे यांनी आपल्या पत्राद्वारे राज्यभरातील कुंकू उत्पादक आणि विक्रेत्यांकडून नमुने संकलित करून त्यांची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी केली असून, भेसळ आढळून आल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश द्यावेत, असे स्पष्ट केले आहे.
डॉ. गोऱ्हे यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तांनाही यासंदर्भातील प्रत पाठवून यंत्रणेला सजग राहण्याचे आवाहन केले आहे. महिलांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या या विषयाकडे शासन गांभीर्याने पाहील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.