येरवडा कारागृहात सायबेज साॅफ्टवेअर कंपनीने उभारले प्रतिक्षालय
marathinews24.com
पुणे – कारागृहाबाहेर थांबणाऱ्या नातेवाईकांसाठी आता येरवडा कारागृहाच्या परिसरात अत्याधुनिक प्रतिक्षालय साकारले आहे. प्रतिक्षालयात एकाचवेळी तब्बल १ हजार ५०० नातेवाईक थांबू शकतात. येरवडा कारागृहातील प्रतिक्षालय हे राज्यातील सर्वात मोठे प्रतिक्षालय ठरले आहे. सायबेज फाऊंडेशनने हे प्रतिक्षालय बांधण्यासाठी कारागृह प्रशासनाला सामाजिक दायित्व निधीतून (सीएसआर) भरीव आर्थिक मदत केली आहे. अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक डॉ. सुहास वारके, विशेष पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रतिक्षालय उभारण्यात आले आहे.
महिलेची रिक्षात विसरलेली पर्स पोलिसांनी शोधून दिली – सविस्तर बातमी
कारागृहाच्या परिसरात महिला कैद्यांच्या मुलांसाठी पाळणाघर, तसेच विविध सुविधांसाठी सायबेज फाऊंडेशनने मदत केली आहे. येरवडा कारागृहातील प्रतिक्षालयात संगणकीकृत नोंदणी कक्ष आहे. या कक्षात कैद्यांची भेट घेणारे नातेवाईक नाेंदणी करू शकतात. प्रतिक्षालयाचे उद्घाटन सोमवारी ( दि.१९) करण्यात आले. यावेळी कारागृह विभागाच्या उपमहानिरीक्षक स्वाती साठे, सायबेज साॅफ्टवेर प्रा. लि. चे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण नथानी, सायबेज फाऊंडेशनच्या प्रमुख रितू नथानी, येरवडा कारागृहाचे अधीक्षक सुनील ढमाळ, उपअधीक्षक पल्लवी कदम उपस्थित होते.
सायबेज फाऊंडेशनकडून ग्रामीण भागातील विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले आहेत. कारागृहातील बंदी, त्यांच्या नातेवाईकांसाठी यापूर्वी विविध उपक्रम राबविण्यात आले आहे. कैद्यांची भेट घेण्यासाठी येणारे नातेवाईक कारागृहासमोरील मोकळ्या जागेत थांबयाचे. ही बाब माझ्या लक्षात आली. त्यानंतर कैद्यांच्या मुलाखतीसाठी येणाऱ्या नातेवाईकांसाठी प्रतिक्षालय बांधण्यासाठी आम्ही कारागृह प्रशासनाकडे परवानगी मागितली. कारागृह प्रशासनाने होकार दिल्यानंतर १४ महिन्यात हे प्रतिक्षालय बांधून पूर्ण झाले. प्रतिक्षालयात दीड हजारपेक्षा जास्त नातेवाईक थांबू शकतात. त्यांच्यासाठी आसन व्यवस्था, प्रसाधनृह, पिण्याच्या पाण्याची सुविधा, छोटे उपाहारगृह आहे. मुलाखत कक्षात जाण्यासाठी प्रतिक्षालयातून मार्ग करण्यात आला आहे, असे नथानी यांनी नमूद केले. कैद्यांच्या कुटुंबीयांसाठी अत्याधुनिक प्रतिक्षालय बांधण्यात आले आहे.कक्षात कैद्यांची भेट घेण्यासाठी येणाऱ्या वकिलांसाठी विशेष कक्ष असणार आहे, असे त्यांनी नमूद केले.