महिलेला २०० मीटर फरफटत नेले, कात्रज परिसरातील घटना
marathinews24.com
पुणे – भरधाव टेम्पोने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार महिला ठार झाली. दुचाकीवरील महिला रस्त्यावर पडल्यानंतर टेम्पोने २०० मीटर अंतर फरफटत नेले. महिलेच्या पायाला गंभीर दुखापत झाली. १ तास रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने नागरिकांनी खासगी वाहनातून उपचारासाठी महिलेला दवाखान्यात दाखल केले, मात्र उपचार सुरू असताना महिलेचा मृत्यू झाला.
पुण्यातील रिक्षा चालकाचे विकृती, गुगल पे नंबरवर तरुणीला केला फोन – सविस्तर बातमी
अपघात झाल्यानंतर ट्रकचालकाने पळ काढला. परंतु पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. अपघात झाल्यानंतर काही काळ अपघातस्थळी नागरिकांनी आक्रोश केला. वारंवार या ठिकाणी अपघात होत असल्याने कात्रजमधील अपघात थांबणार कधी, निष्पाप लोकांचा बळी आणखी किती दिवस जाणार असा सवाल प्रत्यक्षदर्शी सुशांत मोरे यांनी विचारला. रविवारी दुपारच्या वेळेस कात्रज बाह्यवळण रस्त्यावरील वंडर सिटीजवळ दुचाकी (एमएच १२ एसपी १२६९) व ट्रक (एमएच १६ सीसी ४३४५) यांचा अपघात झाला. यामध्ये दुचाकीस्वार महिला लहूबाई अश्रुबा वाघमारे (४९, रा. वाघजाई नगर, आंबेगाव खुर्द) यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुचाकीवरील दुसरी महिला प्रियांका राऊत (३३) यांच्या पायाला गंभीर दुखापत होऊन जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अपघातातील ट्रक चालक नीलेश नांदगुडे (३८, रा. इंदापूर) याला आंबेगाव पोलिसांनी अटक केली आहे. त्याला वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात दाखल केले. तपास सुरू असल्याचे आंबेगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शरद झिने यांनी सांगितले.