नवर्यासह साथीदाराला इंदापूर पोलिसांनी केली अटक
marathinews24.com
पुणे – पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीनेच तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर पत्नी हरविल्याची इंदापूर पोलीस ठाण्यात तक्रार देत त्याने साळसूदपणाचा आव आणला. मात्र, पोलिसांनी चाणाक्ष तपासासह खबर्यांच्या माहितीनुसार महिलेच्या खुनाला वाचा फोडली आहे. याप्रकरणी पतीसह साथीदाराला बेड्या ठोकल्या आहेत. ज्योतीराम करे आणि दत्तात्रय गोलांडे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. ही घटना ३ महिन्यांपुर्वी इंदापूर तालुक्यात घडली होती.
पुणे : जुन्या भांडणाच्या रागातून दोघा भावडांवर वार – सविस्तर बातमी
इंदापूर तालुक्यातील चितळकरवाडीतील प्रियंका शिवाजी चितळकर आणि ज्योतीराम करे यांचे २०१३ साली लग्न झाले होते. लग्नानंतर अनेक वर्ष त्यांचा सुखाचा संसार सुरू असताना दोन मुलेही झाली होती. दरम्यान मागील काही महिन्यांपासून ज्योतीराम हा पत्नी प्रियंकाच्या चारित्र्यावर वारंवार संशय होता. त्यामुळे त्यांच्यात सातत्याने वाद होत होते. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत ज्योतीरामने तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह इंदापुरपासून जवळपास ३०० किलोमीटर अंतरावरील नाशिक जिल्ह्यातील नांदगाव घाटात २०० फुट खोल दरीत फेकून दिला. पत्नीचा खून पचविण्यासाठी आरोपी ज्योतीरामने चक्क इंदापूर पोलीस ठाणे गाठून पत्नी मिसिंग असल्याची तक्रार दाखल केली.
पत्नीचा खून केल्यानंतर आरोपी ज्योतीरामने २९ जानेवारी २०२५ रोजी इंदापूर पोलीस ठाण्यात धाव घेउन बायको हरवल्याची नोंद केली होती. त्यानुसार पोलिसांनी तातडीने तपासाला गती दिली होती. संबंधित महिला हरवली नाही तर तिचा खून झाला असावा असा संशय इंदापूर पोलिसांना आला. त्यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला होता. ज्योतीराम हा सातत्याने पोलिसांना खोटी माहिती देण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे प्रियंकाचा शोध लावणे हे इंदापूर पोलिसांसमोर आव्हान होते. अखेर खबर्यांची माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाद्वारे पोलिसांनी आरोपी ज्योतीरामला ताब्यात घेतले. त्याला खाक्या दाखविताच त्याने पत्नी प्रियकांला आपणच मारल्याची कबुली दिली. त्यानंतर मित्राच्या मदतीने तिचा मृतदेह गाडीतून नाशिक जिल्ह्यातील नांदगाव डोंगर घाटात फेकल्याचे सांगितले.
पोलिसांनी आरोपी ज्योतीरामला ताब्यात घेउन त्याला नांदगाव परिसरात नेले. डोंगरातील २०० फुट खोल दरीत कुजलेल्या अवस्थेत मृतदेह मिळून आला. अखेर ज्योतीरामने केलेल्या कृत्याची कबुली देताच पोलिसांनी त्याच्यासह साथीदार असलेल्या मित्र दत्तात्रय गोलांडे याला बेड्या ठोकल्या. दरम्यान, ज्योतीराम करे हा ट्रॅक्टर चालक असून, साखर कारखान्याला ऊस वाहून नेण्यासाठी नांदगावात होता. त्यामुळे त्याला संबंधित परिसराची चांगली माहिती होती. पत्नीचा खून केल्यानंतर त्याने मृतदेह गाडीतून नेत नांदगावच्या डोंगरदरीत मृतदेह फेकला. अखेर तीन महिन्यानंतर पोलिसांनी प्रियंका हरवली नसून, तिचा खून झाल्याचे उघडकीस आणले.