होणारा नवरा न आवडल्याने मारेकरी धाडले टोळक्याला बेड्या, यवत पोलिसांची कामगिरी
पुणे– कुटूंबियांनी लग्नासाठी निवडलेला मुलगाच आवडला नसल्यामुळे एका तरूणाने चक्क त्याला मारण्याची दीड लाखांची सुपारी दिल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, तरूणावर हल्ला करणार्या आरोपींना यवत पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मुख्य आरोपी तरूणी मात्र पसार असून, तिचाही शोध घेतला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी आरोपीकडून गुन्ह्यातील मोटार, लाकडी दांडके जप्त केले आहे.
आदित्य शंकर दांगडे वय १९, रा. गुघलवडगाव ता. श्रीगोंदा, अहिल्यानगर, संदीप दादा गावडे वय ४० शिवाजी रामदास जरे वय ३२ रा. इंद्रभान सखाराम कोळपे वय ३७ दोघेही रा. पिंपळगाव पिसा ता. श्रीगोंदा, सुरज दिगंबर जाधव वय ३६ रा. काष्टी, श्रीगोंदा अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. मयूरी सुनील दांगडे रा. श्रीगोंदा पसार आहे. याप्रकरणी सागर जयसिंग कदम वय २८ रा. माहिजळगाव ता. कर्जत, अहिल्यानगर याने यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना २७ फेबु्रवारीला कासुर्डी ता. दौंड गावच्या हद्दीत खामगाव फाट्याजवळ घडली होती.
खाजगी कार्यालयातून साडेपाच लाखाची रोकड चोरीला – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार सागर कदम हा हॉटेलमध्ये कुक असून, त्याचे काही महिन्यांपुर्वी मयूरी दांगडे हिच्यासोबत लग्न ठरले होते. मात्र, मयूरीला होणारा नवरा आवडत नसल्यामुळे तिने त्याला धडा शिकविण्याचे ठरविले. २७ फेबु्रवारीला सागर हा खामगाव फाट्याजवळ असताना मोटारीतून आलेल्या हल्लेखोरांनी त्याला धमकाविले. तू जर मयूरीसोबत लग्न केले तर, तुला दाखवितो असे म्हणत मारहाण केली. याप्रकरणी सागरने १ मार्चला यवत पोलीस ठाण्यात धाव घेउन तक्रार दाखल केली. गुन्ह्याच्या अनुषंगाने यवत पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजनुसार मोटारीच्या क्रमांंकानुसार आरोपी आदित्य दांगडे याची चौकशी केली. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
मयूरीने दिली होती दीड लाखांची सुपारी
होणारा नवरा आवडत नसल्यामुळे मयूरी दांगडे हिने संदीप गावडे याच्या माध्यमातून मारहाण करण्यासाठी दीड लाखांची सुपारी दिली.त्यानंतर आदित्यने साथीदारांना बोलावून घेत मोटारीतून प्रवास केला. खामगाव फाट्याजवळ तक्रारदार सागरला गाठून बेदम मारहाण केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाचजणांना अटक केली आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर अधीक्षक गणेश बिराजदार, उपविभागीय अधिकारी बापूराव दडस, पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, एपीआय महेश माने, एपीआय प्रवीण संपांगे, सलीम शेख, किशोर वागज, मारोती मेतलवाड, कर्चे, गायकवाड, देवकर, काळे, चांदणे, यादव, कापरे, बाराते, गरूड, भानवसे यांनी केली.