महिलांचे दागिने चोरणारे चोरटे गजाआड, पुणे ग्रामीण पोलिसांची कामगिरी
Marathinews24.com
पुणे – पुणे जिल्ह्यातील जुन्नर, शिरूर, शिक्रापूर परिसरात पादचारी महिलांकडील दागिने चोरणाऱ्या चोरट्यांना ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. चोरट्यांकडून ५ गुन्हे उघडकीस आले असून, त्यांच्याकडून ७ लाख १६ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त केले.
अनिल सोमनाथ गव्हाणे (वय ३१, रा. गव्हाणेवाडी, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर), अनिल नारायण गव्हाणे (वय २५, रा. दाणेवाडी, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
जुन्नर परिसरात ११ मार्च रोजी ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र, माळ असे १ लाख ८० हजार रुपयांचे दागिने दुचाकीस्वार चोरट्यांनी चोरुन नेले होते. याबाबत ज्येष्ठ महिलेने जुन्नर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. याप्रकरणाचा समांतर स्थानिक गुन्हे शाखेकडून तपास करण्यात येत होता. चोरटे दुचाकीवरुन पसार झाले होते. पोलिसांनी जुन्नर ते शिरूर परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. तपासात मिळालेल्या माहितीनुसार, चोरटे श्रीगोंदा तालुक्यातील दाणेवाडी परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्यांना पकडले.
आरोपी गव्हाणे यांनी जुन्नर, शिक्रापूर, शिरुर, आळेफाटा परिसरात महिलांचे दागिने चोरून नेल्याचे तपासात उघडकीस आले आहे. पोलिासांनी आठ तोळे सोन्याचे दागिने, दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला. पोलीस अधीक्षक डाॅ. पंकज देशमुख, अतिरिक्त अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी भाग्यश्री धीरबस्सी, पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलीस निरीक्षक किरण अवचर, सहायक निरीक्षक अरविंद गटकूळ, उपनिरीक्षक अभिजित सावंत, दीपक साबळे, अक्षय नवले, तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजू जाधव, राजू मोमीन, सागर नामदास यांनी ही कामगिरी केली.