ज्येष्ठाचा तिघांनी मिळून केला खून, वानवडीतील घटना
marathinews24.com
पुणे – किरकोळ वादातून तिघांनी ज्येष्ठाला बेदम मारहाण करून त्याचा खून केल्याची घटना वानवडी भागात घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मलंग मेहबूब कुरेशी (वय ६०, रा. शिवनेरीनगर, कोंढवा) असे खून झालेल्याचे नाव आहे. याबाबत त्यांचा मुलगा सोहेल (वय २८) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आदिल शेख, आकाश धांडे यांच्यासह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पुणे : बेदरकारपणा तरुणांच्या जीवावर बेतला – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मलंग कुरेशी शुक्रवारी दुपारी साडेचारच्या सुमारास वानवडीतील शांतीनगर भागात एका ताडी विक्री दुकानात गेले होते. तेथे ताडी पित असताना आरोपींशी त्यांचा किरकोळ कारणावरुन वाद झाला. आरोपी शेख, धांडे आणि साथीदारने कुरेशी यांना बेदम मारहाण केली. त्यांना दुकानातील लोखंडी दरवाज्यावर ढकलून दिले. कुरेशी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.
या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे, वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजीत आदमाने यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेले आरोपी शेख आणि धांडे यांना ताब्यात घेण्यात आले. रात्री उशीरा गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली. आरोपींबरोबर पांडा नावाचा एक जण होता. त्याचा शोध सुरू आहे. पोलीस उपनिरीक्षक वाकडे तपास करत आहेत.