मेंटेनन्सच्या मागणीवरून वाद, चेअरमनवर हल्ला
marathinews24.com
पुणे – सोसायटीतील किरकोळ वादाचे रूपांतर गंभीर भांडणात होण्याच्या घटना अलीकडे वाढल्या असून, अशाच एका प्रकरणाची नोंद हडपसर पोलिस ठाण्यात झाली आहे. झेड कॉर्नरमधील रॉयल रेसिडेन्सी सोसायटीमध्ये सहा महिन्यांपासून मेंटेनन्स न भरल्याने विचारणा करताच सदस्याने सोसायटीच्या चेअरमनच्या डोक्यात दगड घालून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यातील सोमेश्वर वाडी चौकाकडून वाहनांची तोडफोड – सविस्तर बातमी
कामील शेख (रा. फ्लॅट क्र. १०४, रॉयल रेसिडेन्सी, झेड कॉर्नर, मांजरी बुद्रुक) आणि त्याचा मेव्हणा यांच्याविरोधात हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. प्रमोद सुखदेव ओव्हाळ (वय ३८ रा.मांजरी बुद्रुक) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रमोद ओव्हाळ हे गेली सात वर्षे रॉयल रेसिडेन्सी येथे राहत असून मागील दोन वर्षांपासून सोसायटीचे चेअरमन म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी इमारतीचा मेंटेनन्स गोळा करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. संबंधित इमारत रियाज पठाण यांनी २०१७ मध्ये बांधली असून, त्यातील एक फ्लॅट कामील शेखला राहण्यासाठी दिला आहे. दि. २० एप्रिलला रात्री साडेआठच्या सुमारास ओव्हाळ हे घरी जात असताना इमारतीच्या गेटसमोर त्यांची भेट कामील शेख आणि त्याच्या मेव्हण्याशी झाली. तेव्हा ओव्हाळ यांनी थकित मेंटेनन्सबाबत विचारणा केली असता, वाद निर्माण झाला. वाद विकोपाला जाताच रस्त्यावर पडलेला दगड उचलून ओव्हाळ यांच्या डोक्यात मारला.
घटनेनंतर ओव्हाळ यांच्या घरातील लोक बाहेर आले. त्यांनी जाब विचारल्यावर त्यांनाही दोघांनी धक्काबुक्की केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. जखमी प्रमोद ओव्हाळ यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले असून पुढील तपास हडपसर पोलिस करत आहेत.