मध्यभागात मोटारी, पीएमपीएल बसला प्रवेश बंद
marathinews24.com
पुणे – अक्षय तृतीयेनिमित्त छत्रपती शिवाजी रस्त्यावरील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात होणारी भाविकांची गर्दी विचारात घेऊन बुधवारी (३० एप्रिल) वाहतूक बदल केले आहेत. छत्रपती शिवाजी रस्ता, गणेश रस्ता, तसेच लक्ष्मी रस्ता परिसरात वाहतूक बदल करण्यात आले आहे. या भागातील पीएमपी बस सेवा पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.
अनधिकृत बाल संस्था सुरु असल्यास कळवावे-महिला व बालविकास आयुक्त नयना गुंडे – सविस्तर बातमी
अक्षय तृतीयेनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात आंबा महोत्सवाचे आयोजन केले आहे. बुधवारी सकाळी सात ते रात्री बारा यावेळेत या भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी रस्ता, गणेश रस्ता, लक्ष्मी रस्त्याचा वापर करणार्या मोटारचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, पीएमपी बससेवा पर्यायी मार्गाने वळविली आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे अमोल झेंडे यांनी दिली आहे.
छत्रपती शिवाजी रस्त्यावरील स. गो. बर्वे चौकातून (मॉडर्न कॅफे हॉटेल) स्वारगेटकडे जाणार्या वाहनांनी जंगली महाराज रस्ता, डेक्कन जिमखाना, खंडोजीबाबा चौक, टिळक चौकमार्गे इच्छितस्थली जावे. स. गो. बर्वे चौकातून महापालिकेकडे जाणार्या वाहनांनी जंगली महाराज रस्ता, झाशीची राणी लक्ष्मीबाई चौक, काँग्रेस भवन या मार्गाने महापालिका भवन येथे जावे. दारुवाला पूलाकडून फडके हौदमार्गे जाणारी पीएमपी बस सेवा पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. अप्पा बळवंत चौक ते हुतात्मा चौक (बुधवार चौक) दरम्यान गर्दी वाढल्यास या भागातील वाहतूक बंद करून बाजीराव रस्ता, शनिवारवाडा मार्गाने वळविण्यात येईल. वाहनचालाकांनी पोलिसांच्या सूचनांचे पालन करुन सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस उपायुक्त झेंडे यांनी केले आहे.