गुंडगिरी, दादागिरी खपवून घेउ नका, गरिबांना त्रास देउ नका
marathinews24.com
पुणे – वाहतूक नियमन करण्यासाठी तैनात कर्मचारी-अधिकार्यांना सॉफ्ट स्कीलचे प्रशिक्षण दिले आहे. त्यांच्या देहबोलीत, भाषेत आणि वागणूकीत नक्कीच बदल पाहायला मिळणार आहे. विशेषतः आता पावसाळ्यात आमचे वाहतूक अमलदार आणखी ताकदीने काम करतील. कोंडी सोडविण्यासाठी कोणाच्याही आदेशाची वाट न पाहता थेट घटनास्थळी मदतीला धावतील. दरम्यान, वाहतूक विभागात कार्यरत असेलल्या सर्वांनीच घेतलेल्या प्रशिक्षणाचा उपयोग फिल्डवर करावा. बेशिस्तांविरूद्ध कठोर कारवाई करीत असताना सर्वसामान्यांना त्रास देउ नका. त्यासोबतच गुंडगिरी, दादागिरी खपवून घेउ नका, कारवाईचा बडगा उगारा असे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत.
वानवडीतील शिवरकर सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, अश्विनी मल्होत्रा, अजय अगरवाल, मंजिरी गोखले यांच्यासह कर्मचारी-अधिकारी उपस्थित होते. २३ फेबु्रवारी ते १० मे कालावधीत तीन दिवशीय १८ सत्रात वाहतूक अमलदारांना प्रशिक्षण देण्यात आले. ६३ अधिकारी व १ हजार ४५ यांना प्रशिक्षण देण्यात आले. विशेषतः प्रशिक्षणादरम्यान वाहतूकीचे कायदे, तंत्रज्ञान, इ-चलन मशीनचा उपयोग, वाहतूक नियमन, व्हीआयपी-व्हीव्हीआयपी बंदोबस्त, अपघात, अचानक उद्भवणारे प्रसंग, सॉफ्ट स्कीलचे धडे अमलदारांसह अधिकार्यांना देण्यात आले. प्रशिक्षणासाठी पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी, पोलीस निरीक्षक रूणाल मुल्ला, उपनिरीक्षक चंद्रकांत रघतवान, देवीदास पाटील, मल्हारी खडतरे, अश्विनी सरब यांनी कामकाम पाहिले.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, वाहतूक नियमन करणार्या सर्व अधिकारी-कर्मचार्यांचे प्रशिक्षण पुर्ण झाले आहे. त्यामुळे त्यांच्या वर्तनात आणखी सुधारणा होउन परिणामकारण कामगिरी होणार आहे. इथून पुढे प्रत्येक वाहतूक विभागातंर्गत रस्त्यावर पोलिसांची जास्तीत जास्त उपस्थिती आवश्यक आहे. त्यामुळे वाहन चालकांसह नागरिकांमध्ये विश्वास निर्माण होण्यास मदत होणार आहे. दरम्यान, अमलदारांनी वाहन चालकांसोबत बोलताना सॉफ्ट स्कीलचा वापर करीत आपली देहबोली, ड्रेस चांगला ठेवावा.
पोलिसांची प्रतिमा वाहतूक अमलदारांवर आधारित असते. त्यामुळे प्रत्येकाने जबाबदारीने वागणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा म्हणाले, प्रशिक्षणानंतर वाहतूक अमलदारांची जबाबदारी वाढली आहे. पावसाळ्यात वाहतूककोंडी टाळण्यासाठी खबरदारी घ्यावी. सतत अलर्ट रहा, बेशिस्तांविरूद्ध कारवाई करा. नागरिकांना चांगली वागणूक देण्याचे आदेश त्यांनी दिले.
अवजड वाहन चालकांवर कठोर कारवाई करा-पोलीस आयुक्त
वाघोलीसह शहराच्या मध्यवर्ती भागात डंपर चालकासह ट्रॅव्हल्स, अवजड वाहने सर्रासपणे दिसून येतात. त्यांचा कुठलाही मुलाहिजा न ठेवता वाहन जप्तीची कारवाई करा. वाहतूक नियमनासह अपघात रोखण्यासाठी प्राधान्य दिले पाहिजे. झाडाखाली लपून-छपून बेशिस्तांवर कारवाई करू नका. थेट चौकात सीसीटीव्हीखाली उभा राहून बेशिस्तांना धडा शिकवा. रूग्णवाहिकेला रस्ता करून द्या, अपघातग्रस्तांना मदत करा असे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत