सिंहगड रोड पोलीस ठाण्यातील अंमलदार निलंबित
marathinews24.com
पुणे – ट्रक चालकाला मोबाईलवर बोलत ट्रक चालवत असल्याचा आरोप करुन १५ हजार रुपयांच्या दंडाची भीती दाखवून १० हजार रुपये घेऊन वाटमारी करणाऱ्या सिंहगड रोड पोलिस ठाण्यातील पोलिस अंमलदाराला पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी निलंबित केले आहे. नील बापूराव पोपट ढोले असे निलंबन केलेल्या पोलिस अंमलदाराचे नाव आहे. ग्रामीण पोलिसांनी पाठविलेल्या अहवालावरून पोलिसांनी कारवाई केली आहे.
पुण्यात अवैध धंद्याला पाठबळ देणे भोवले, पोलिस उपनिरीक्षक निलंबित – सविस्तर बातमी
पोलिस अंमलदार नील ढोले याने १५ एप्रिल रोजी सकाळी दहाच्या सुमारास खेड शिवापूर बोगद्याच्या पुढे साताऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या ट्रक चालकाला अडवले. ट्रकचालक राहुल कुमार शिवनाथ यादव (रा. प्रयागराज, उत्तर प्रदेश) यांना ‘आप फोन पे बात कर रहे है, उसका चालान १५ हजार रुपये है’ असे म्हणून १५ हजार रुपयांची मागणी केली. त्यांना स्वत:च्या गाडीत बसवले. माझ्याकडे ऐवढे पैसे नाहीत, बँक खात्यात १० हजार रुपये आहेत, असे सांगितले. तेव्हा ढोलेने ट्रक चालकाला खेड शिवापूर परिसरात पेट्रोल पंपावर गेला. तेथील कर्मचाऱ्याला ऑनलाईन पैसे वर्ग करण्यास सांगितले. परंतु, त्याने रोख पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर तो ट्रक चालकाला गॉगल स्टॉलच्या दुकानात घेऊन गेला. तेथील दुकानदाराला ऑनलाईन पैसे देऊन त्याच्याकडून १० हजार रुपये घेतले.
वाटमारीनंतर ट्रक चालक राहुल यादव यांनी तक्रार केली. त्याची चौकशी करण्यासाठी नील ढोले याच्याशी संपर्क साधला गेला. त्यावेळी त्याने ट्रक चालकाची माफी मागून १० हजार रुपये ट्रक चालकाला परत केले. पोलिस दलाच्या कर्तव्याशी प्रतारणा करणारे अत्यंत गलिच्छ व भ्रष्टाचाराला पोषण देणारे कृत्य केल्याने पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी नील ढोले याला निलंबित करण्याचे आदेश दिले.