माता न तू वैरिणी, जुळ्या मुलांचा आईने केला खून, पाण्याच्या टाकीत मुलांना बुडवून मारले
Marathinews24.com
पुणे – जुळ्या मुलांची वाढ नीट होत नसल्याने आईने त्यांना घराच्या छतावरील पाण्याच्या टाकीत बुडवून मारल्याची धक्कादायक घटना पुणे-सोलापूर रस्त्यावरील थेऊर परिसरात घडली. जुळ्या मुलांना टाकीत बुडविल्यानंतर आईने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली. जुळ्या मुलांचा खून केल्याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी आईला मंगळवारी रात्री उशीरा अटक केली.
जुळ्या मुलांचा खून केल्याप्रकरणी प्रतिभा हेमंतकुमार मोहिते (वय ३५, सध्या रा. काकडे वस्ती, दत्तनगर, थेऊर, पुणे-सोलापूर रस्ता, मूळ रा. मिरजवाडी, आष्टा, जि. सांगली) हिला अटक करण्यात आली आहे. याबाबत प्रल्हाद लक्ष्मण गोंडे (रा. काकडे वस्ती, दत्तनगर, थेऊर, पुणे-सोलापूर रस्ता) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतिभाचे माहेर काकडे वस्ती परिसरात असून तिचे पती सांगलीतील बँकेत कामाला आहेत. सध्या ती माहेरी राहत होती. १० वर्षांपूर्वी तिचा हेमंतकुमार यांच्याशी विवाह झाला होता.
विवाहानंतर १० वर्ष अपत्य प्राप्ती न झाल्याने मोहिते दाम्पत्याने कृत्रिम गर्भधारणा करण्याचा निर्णय घेतला. टेस्टट्युबद्वारे त्यांनी दोन मुलांना जन्म दिला. जुळी मुले दाेन महिन्यांची होती. त्यांची वाढ नीट होत नसल्याने प्रतिभा तणावात होती. मंगळवारी सकाळी पावणेसातच्या सुमारास प्रतिभा जुळ्या मुलांना घेऊन घराच्या छतावर गेली. त्यानंतर दोघांना तिने पाण्याच्या टाकीत बुडविले. प्रतिभाने पाण्याचा टाकीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना भागातील एका रहिवाशाने पाहिले. त्याने त्वरीत घटनेची माहिती भाऊ प्रल्हाद गोंडे यांना दिली. मुलांसह प्रतिभाला पाण्याच्या टाकीतून बाहेर काढले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच जुळ्या मुलांचा मृत्यू झाला होता.
घटनेची माहिती मिळताच परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे, सहायक आयुक्त अनुराधा उदमले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी रात्री उशीरा जुळ्या मुलांचा खून केल्याप्रकरणी प्रतिभाविरुद्ध गुन्हा दाखल करुन तिला अटक केली. पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार तपास करत आहेत.
पत्नीने केलेल्या कृत्याचा पतीला धक्का
मंगळवारी रात्री उशीरा प्रतिभाचे पती सांगलीहून दाखल झाले. जुळ्या मुलांचा पत्नीने खून केल्याचे उघडकीस आल्यानंतर पतीला धक्का बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रतिभा नैराश्यात होत्या, अशी माहिती चाैकशीत मिळाली आहे, असे पोलिसांनी सांगितले.