पथक अचानक करणार तपासणी
marathinews24.com
पुणे – आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिका-इराण युद्धामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे हिंदुस्थानात घरघुती गॅसचा काळाबाजार होण्याची शक्यता आहे. त्यापार्श्वभूमीवर राज्य शासनाने गॅस टाक्यांचा काळाबाजार रोखण्यासाठी शहर व जिल्हा स्थरावर दक्षता/फिरते पथक निर्माण करण्याचे आदेश दिले आहेत. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने हे आदेश दिले असून, या पथकात अन्यधान्य वितरण अधिकारी तसेच पुरवठा निरीक्षण अधिकारी, संबंधित एलपीजी कंपन्याचे अधिकारी आणि संबंधित पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांची नेमणूक आहे. पथक अचानक तपासणी देखील करणार असून, सुरळीत पुरवठा ठेवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकीच्या बतावणीने गंडा – सविस्तर बातमी
आखाती देशात युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशात गॅसचा पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. शासनाकडून मात्र, घरघुती गॅस पुरवठा अखंडीत सुरू राहिल यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, राज्यभरात गॅसचा तुठवडा होईल, या भितीने सर्व सामान्य नागरिक गॅससाठी लाईन लावत आहेत. राज्यभरात गोंधळाची परिस्तिथी निर्माण झाली आहे. त्यामुळे या गोंधळाचा गैरफायदा घेऊन घरघुती गॅसचा काळा बाजार होण्याची दाट शक्यता लक्षात घेऊन शासनाने राज्यभरात दक्षता पथके तयार केले आहेत. याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना पोलिस तसेच अन्नधान्य विभागाला दिले आहेत.
चार सदस्याचे एक पथक शहर स्थरावर त्या-त्या विभागात तयार करण्यात आले आहे. पुण्यातील प्रत्येक विभागात एक पथक असणार आहे. हे पथक आप-आपल्या भागातील गॅस पुरवठ्याकडे लक्ष ठेवून त्यात काळाबाजार होणार नाही याची दक्षता घेणार आहे. जिल्हा स्थरावर एक पथक असणार आहे. ही पथके संबंधित गॅस एजन्सीला अचानक भेट देऊन तपासणी देखील करणार आहेत. दक्षता पथकात शहराचे अन्नधान्य वितरण अधिकारी पथक प्रमुख असणार आहेत. त्याखाली परिमंडळाचे संबंधित विभागाचे पुरवठा निरीक्षण तसेच संबंधित पोलिस ठाणे व गॅस एजन्सीचे अधिकारी सदस्य असतील. पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीत तसेच पुणे ग्रामीण भागात स्वतंत्र पथके कार्यरत राहणार आहेत.
पथकाकडून ठेवली जाणार दक्षता
घरगुती गॅस सिलिंडरचा अवैध वापर, व्यावसायिक ठिकाणी घरगुती गॅसचा वापर, साठेबाजी किंवा काळाबाजार होणार नाही, हे पाहणे पथकाचे काम आहे. याबाबत अचानक तपासणी करणे. गॅस वितरण व्यवस्थेवर लक्ष ठेवून ग्राहकांना वेळेवर गॅस मिळतो का, याचीही पाहणी करण्यात येणार आहे. नियमभंग आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेशात नमूद केले आहे.
























