युवासेना सचिव किरण साळी यांचा पुढाकार
marathinews24.com
पुणे – राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांचे प्रश्न, अडचणी आणि अपेक्षा थेट लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचविण्यासाठी युवासेनेच्या वतीने ‘युवांचा आवाज, शिवसेना लोकप्रतिनिधींसोबत संवाद’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. युवासेना सचिव किरण साळी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. महाराष्ट्र विधान परिषद सदस्या तथा माजी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणार आहेत.
फुरसुंगीत चाकूच्या धाकाने तरुणाला लुटले, आरोपीला अटक – सविस्तर बातमी
गुरुवार, दि. २७ ऑगस्टला सकाळी १०.३० वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील जयकर नॉलेज रिसोर्स सेंटर येथे हा कार्यक्रम होणार आहे. युवासेना, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कक्षाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना थेट लोकप्रतिनिधींशी संवाद साधण्याची संधी या उपक्रमातून मिळणार आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या, प्रवेश व परीक्षा प्रक्रिया, वसतिगृह व मूलभूत सुविधा, विद्यार्थिनींची सुरक्षितता, कौशल्य विकास, रोजगाराच्या संधी तसेच विद्यापीठ स्तरावरील विविध अडचणी या संवादात मांडल्या जाणार आहेत. विद्यार्थ्यांचे प्रश्न केवळ ऐकून न घेता, त्यावर संबंधित यंत्रणांकडे आवश्यक पाठपुरावा करून मार्ग काढण्याच्या दृष्टीनेही चर्चा करण्यात येणार आहे.
तरुणांच्या प्रश्नांना संघटनात्मक आणि लोकप्रतिनिधींच्या स्तरावर प्रभावी व्यासपीठ मिळावे, त्यांच्या समस्या शासन व संबंधित यंत्रणांपर्यंत पोहोचाव्यात, त्यावर ठोस कार्यवाहीसाठी पाठपुरावा व्हावा, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. ‘विद्यार्थ्यांच्या समस्या व प्रश्न सोडविण्यासाठी थेट शिवसेना लोकप्रतिनिधींसोबत १ टू १ चर्चा’ हे या उपक्रमाचे वैशिष्ट्य असून, विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपले प्रश्न, सूचना, अपेक्षा मांडाव्यात, असे आवाहन युवासेना सचिव किरण साळी यांनी केले आहे.























