५ किलो २६२ ग्रॅम मेथाक्वालोन बँकॉकहून पुण्यात
marathinews24.com
पुणे – अमली पदार्थांच्या तस्करीसाठी ड्रग तस्कर वेगवेगळ्या कुल्प्या लढवत असतात. अशीच नाविन्यपूर्ण एक आयडिया ड्रग तस्करी करणार्या महिलेनी लढवून थेट बँकॉक येथून कॉफीच्या पाकीटांमध्ये तब्बल ५ किलो २६२ ग्रॅम मेथाक्वालोन हा तब्बल २ कोटी ६१ लाखांचा बंदी असलेला अमली पदार्थ तस्करी केला. मात्र सीमा शुल्क विभागाच्या (कस्टम) गुप्तचर यंत्रणेने हा प्रकार उघडकीस आणला. याप्रकरणी मुंबईच्या महिलेला अटक करण्यात आली आहे. फहेमिदा मोहम्मद साहिद अली खान ( वय ४४, रा. नयानगर, रहेजा हॉस्पीटल मार्ग, माहिम वेस्ट, मुुंबई) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. कस्टम विभागाच्या पोलिस निरीक्षक पलक यादव यांनी फिर्याद दिली आहे.
आमदार हेमंत रासने यांच्या कार्यालयावर रहिवाशांचा हल्लाबोल – सविस्तर बातमी
बँकॉकवरून १८ सप्टेंबरला संध्याकाळी आलेले एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान पुण्यात उतरले होते विमानतळाच्या बाहेर पडत असताना गुप्तचर यंत्रणेच्या पथकातील काहींना फहमीदाच्या हालचालींवर संशय आला. त्यानंतर कस्टमच्या अधिकार्यांनी तिला रोखले. तपासणीसाठी उघडण्यात आलेल्या गुलाबी रंगाच्या ट्रॉली बॅगमध्ये कपडे, चॉकलेट्ससोबत १० कॉफी पाकिटे सापडली. त्या कॉफीची साधी वाटणारी ९ पाकीटे कस्टम विभागाने फोडून पाहिली असता त्यामध्ये पांढर्या रंगाची पावडर विभागाला आढळली. किटद्वारे त्या पदार्थाची तपासणी केल्यानंतर तो पदार्थ प्रतिबंधीत असलेला अमली पदार्थ मेथाक्वालोन असल्याचे लक्षात आले.
पथकाने लागलीच तस्कर महिलेला ताब्यात घेतले. तिच्याकडून लपवून आणलेले ५ किलो २३४ ग्रॅम वजानाचा मेथाक्वालोनचा साठा जप्त करण्यात आला. पंचासमक्ष आणि व्हिडिओ रेकॉर्डिंगसह झालेल्या या कारवाईत फहमीदाकडून तिचा पासपोर्ट, मोबाईल फोन आणि प्रवासाशी संबंधित कागदपत्रेही जप्त करण्यात आली. सीमा शुल्क विभागाच्या निरीक्षक पलक यादव यांच्या नेतृत्वाखाली ही धडाकेबाज कारवाई पार पडली. अधीक्षक अजय मलिक, निरीक्षक अभयकुमार गुप्ता आणि अधीक्षक मनीषा बिनॉय यांच्या पथकाने ही कारवाई केली. १९ सप्टेंबरच्या पहाटेच आरोपी फहमीदाला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. विशेष सरकारी वकील ऋषीराज वाळवेकर यांनी तिच्या पोलिस कोठडीची मागणी केली. यावेळी त्यांनी बँकॉकवरून तस्करी झालेल्या अमली पदार्थाच्या तस्करीमध्ये आंतराष्ट्रीय रॅकेट जोडले असण्याची शक्यता यावेळी व्यक्त करण्यात आली.





















