डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाल्याची घटना पुणे-सातारा रस्त्यावर घडली. या प्रकरणी डंपर चालकाविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. परिमा हेमंत प्रधान (वय ३८, रा. थ्री ज्वेलस सोसायटी, टिळेकरनगर, कात्रज कोंढवा रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत अभिषक निगडे (वय ३५, रा. कात्रज-कोंढवा रस्ता) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यत फिर्याद दिली आहे. या प्रकरणी डंपर चालक संजय प्रभाकर जाधव (वय २८, रा. मानकर चौक, ऊरळी देवाची, हडपसर-सासवड रस्ता) याच्या विरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यात यल्लम्मा देवीचा मुकुट चोरणारा गजाआड – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडे यांच्या नातेवाईक परिमा प्रधान शुक्रवारी सकाळी पावणेनऊच्या सुमारास पुणे-सातारा रस्त्यावरुन निघाल्या होत्या. कात्रज चौकातील राजीव गांधी प्राणी संग्रहालयासमोर भरधाव डंपरने दुचाकीला धडक दिली. अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील पाटील तपास करत आहेत.
बंदी आदेशाचे उल्लंघन
शहरातील प्रमुख रस्त्यावर जड वाहनांवर दिवसा बंदी घालण्यात आली आहे. डंपर, ट्रक, सिमेंट मिक्सर अशी जड वाहने पोलिसांचे आदेश धुडकावत असल्याचे दिसून आले आहे. भरधाव वेग आणि बेदरकारपणामुळे गंभीर अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.






















