उत्पादन, वितरण अन् बाजारपेठेची साखळी निर्माण करून महिला बचत गटांनी आर्थिक क्रांती करावी; डॉ. नीलम गोऱ्हे यांचे आवाहन

लातूर जिल्ह्यातील महिला बचत गटांच्या ऑनलाईन बैठकीत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन; बँकांच्या जाचक अटींविरोधात लेखी तक्रारी करण्याचे आवाहन; बचत गट भवनासाठी २१ लाखांचा निधी जाहीर

marathinews24.com

लातूर – “महिला बचत गटांची चळवळ ही केवळ आर्थिक व्यवहारांपुरती मर्यादित नसून, महिलांच्या सामाजिक व कौटुंबिक सक्षमीकरणाचा तो एक मुख्य आधार आहे. बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात महिला बचत गटांनी आता पारंपरिक चौकटीबाहेर पडून उत्पादन, वितरण आणि बाजारपेठ अशी मजबूत साखळी निर्माण केली पाहिजे. यासाठी महिलांनी आपले कौशल्य ओळखून बचत गटांचे व्यावसायिक वर्गीकरण करावे,” असे प्रतिपादन शिवसेना नेत्या आणि विधान परिषदेच्या मा.उपसभापती आ.डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले. लातूर जिल्ह्यातील महिला बचत गटांच्या विशेष ऑनलाईन संवाद बैठकीत त्या मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या. अधिक मासाचे औचित्य साधून या विशेष सभेचे आयोजन संपर्कप्रमुख रंजना कुलकर्णी यांच्याकडून करण्यात आले होते.

माजी मंत्री अनंतराव थोपटे यांच्या कुटुंबीयांचे डॉ. नीलम गोऱ्हेंकडून सांत्वन – सविस्तर बातमी

आपल्या मार्गदर्शनात डॉ. गोऱ्हे यांनी बचत गटांच्या बँक खात्यांसंदर्भात आणि कर्ज वितरणात येणाऱ्या अडचणींवर तीव्र चिंता व्यक्त केली. त्या म्हणाल्या, “अनेक बँकांमध्ये संवेदनशील अधिकारी नसल्यामुळे लाडक्या बहिणींना आणि बचत गटांना नाहक हेलपाटे मारावे लागतात. जर एखादी बँक बचत गटाचे खाते उघडण्यास, महासंघाचे नाव लावण्यास किंवा कर्ज देण्यास नकार देत असेल, तर महिलांनी अजिबात घाबरू नये. बँकांना त्याचे लेखी कारण विचारा आणि त्या निवेदनाची एक प्रत माझ्याकडे पाठवा, मी स्वतः शासनाकडे त्याचा पाठपुरावा करेन.” बँकांमध्ये जनतेचेच कोट्यवधी रुपये जमा असतात, त्यामुळे त्यांनी जनतेशी आणि महिलांशी सन्मानानेच वागले पाहिजे, असा कडक इशाराही त्यांनी दिला. तसेच महिलांनी आर्थिक सुलभतेसाठी बँकांच्या ‘ओव्हरड्राफ्ट’ (Overdraft) सुविधेचा जास्तीत जास्त वापर करावा, असेही त्यांनी सुचवले.

महिलांच्या व्यवसायाला व्यावसायिक गती देण्यासाठी बचत गटांचे चार प्रमुख भागांत वर्गीकरण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यामध्ये १) खाद्यपदार्थ तयार करणारे गट, २) कपडे शिवणारे गट, ३) आर्टिफिशियल ज्वेलरी व शोभेच्या वस्तू तयार करणारे गट, आणि ४) शेती व शेतीपूरक व्यवसाय करणारे गट अशा पद्धतीने कामाची विभागणी करावी. अन्नपूर्णा, माणदेशी फाउंडेशन तसेच पुण्याच्या ‘स्वयं सिद्ध’ संस्थेचे यशस्वी उदाहरण देत ३० ते ४० बचत गटांनी एकत्रित येऊन स्वतःचे छोटे मॉल किंवा साखळी दुकाने सुरू करावीत, जेणेकरून उत्पादनांना ॲमेझॉनसारख्या थेट बाजारपेठा मिळतील, असा सल्ला त्यांनी दिला.

औसा आणि उमरगा परिसरातील किल्लारी भूकंपाचा उल्लेख करत डॉ. गोऱ्हे यांनी एक मोठी संधी महिलांसमोर ठेवली. त्या म्हणाल्या की, “२०१४ मध्ये विशेष प्रयत्न करून आम्ही शासन निर्णय (GR) काढून घेतला होता, ज्याद्वारे वन विभागाच्या मदतीने जुन्या गावठाणांच्या जागा साफ करून तिथे सुंदर उद्याने विकसित केली आहेत. या उद्यानांची देखभाल व रखवालीचे काम महिला बचत गटांना मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकारी व वन विभागाशी चर्चा सुरू आहे. यासाठी ‘सीएसआर’ (CSR) फंडही मिळवून दिला जाईल.” याच धर्तीवर लातूर जिल्ह्यात ‘महिला बचत गट भवन’ उभारण्यासाठी आपल्या निधीतून २१ लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा डॉ. नीलम गोऱ्हे यांनी यावेळी केली.

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. मुख्यमंत्री महोदयांनी स्वतःच्या नावामागे आईचे नाव (एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे) लावून महाराष्ट्रात महिलांचा सर्वोच्च सन्मान केला आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातूनही महिलांना मोठी मदत केली जात आहे,” असे सांगत डॉ. गोऱ्हे यांनी महिलांना नकारात्मकता सोडून सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचे आवाहन केले. शेवटी अधिक मासाच्या (धोंड्याच्या महिन्याच्या) मराठवाड्यातील पारंपरिक संस्कृतीचा उल्लेख करत त्यांनी सर्व महिलांना पुरणपोळीचा आस्वाद घेत आनंदी व समृद्ध जीवन जगण्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×