परदेशी चलनात नफा मिळवून देण्याच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार, विमानतळ पोलिसांकडून एकाला अटक
Marathinews24.com
पुणे – परदेशी चलनात गुंतवणुकीच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला विमानतळ पोलिसांनी अटक केली. याबाबत तरुणीने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, शाहिद मुबारक तांबाेळी (वय ३६, रा. मनीष पार्क, कौसरबाग, कोंढवा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शाहिद तांबाेळी आणि पीडित तरुणीची ऑक्टोबर २०२४ मध्ये ओळख झाली होती. त्यावेळी त्याने तरुणीला परदेशी चलनात गुंतवणुकीचे (फाॅरेक्स ट्रेडिंग) आमिष दाखविले होते. गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे सांगून त्याने तरुणीला जाळ्यात ओढले. त्यानंतर त्याने तरुणीवर बलात्कार केला. याप्रकाराची वाच्यता केल्यास आई आणि भावाला जिवे मारण्याची धमकी दिली, तसेच सोशल मीडियावर छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी दिली. तांबोळीच्या धमकीमुळे घाबरलेल्या तरुणीने नुकतीच विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तांबाेळीविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली. पोलीस उपनिरीक्षक रवींद्र ढावरे तपास करत आहेत.