बंडगार्डन पोलिसांची कौशल्यपूर्ण तपास
marathinews24.com
पुणे – ससून हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवल्याच्या खोट्या मेसेजद्वारे पोलिसांसह रुग्णालय प्रशासनाला वेठीस धरणाऱ्या आरोपीला बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे. त्याने महिला रुग्णाचा मोबाईल चोरून मेसेज केला असल्याचे उघडकीस आले आहे. अरविंद कृष्णा कोकणी (वय २९, रा. नागपूर चाळ, येरवडा) यास ताब्यात घेत अटक केली आहे. तांत्रिक माहिती आणि बातमीदारांच्या मदतीने पोलिसांनी कारवाई केली आहे.
अल्पवयीन मुलांच्या टाेळीने ५ वाहनाची केली तोडफोड – सविस्तर बातमी
ससून हॉस्पिटलमधील डॉक्टरच्या मोबाईलवर १२ मे रोजी अज्ञात इसमाकडून हॉस्पिटलमध्ये बॉम्ब असल्याचा मेसेज केला होता. यानंतर बंडगार्डन पोलीस ठाण्याचे अधिकारी, बीडीडीएस पथकाने तत्काळ ससून परिसराची झडती घेतली. परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने संबंधित इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणाचा तपास पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने काम सुरू केले.
पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील लोहार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तांत्रिक विश्लेषण केले. चौकशीत आरोपी हा ससूनमध्ये सुरक्षा रक्षक असून, हॉस्पिटलमधील वॉर्ड क्रमांक ७३ मधून महिला रुग्णाचा मोबाईल त्याने चोरी केला. मोबाईलवरून डॉक्टर व वैद्यकीय अधीक्षकांना धमकीचे मेसेज पाठवले. नंतर त्याने मोबाईल बंद करून पुन्हा दुसऱ्या दिवशी दुसरा मेसेज पाठवला होता. त्यानुसार पथकाने १४ मे रोजी त्याला अटक केली.
पोलिसांनी जलद आणि तांत्रिक तपासामुळे ससूनसारख्या महत्त्वाच्या रुग्णालयात निर्माण झालेली भीती दूर झाली आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त दीपक निकम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र गायकवाड, उपनिरीक्षक स्वप्नील लोहार, प्रदीप शितोळे, सारस साळवी, प्रकाश आव्हाड, मनोज भोकरे, मनिष संकपाळ, महेश जाधव, विष्णू सरवदे, अमित सस्ते, रामदास घावटे यांनी केली.