जन्मदात्यांनी उघड्यावर फेकले, पोलिसांनी वाचवले, पुण्यात १३ अर्भकांचे प्राण पोलिसांनी वाचवले
Marathinews24.com
पुणे- शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये जन्मदात्यांनी आपल्या नवजात चिमुरड्यांना उघड्यावर फेकले होते. मात्र पुणे पोलिसांसह सामाजिक संघटनांनी पुढाकार घेत चिमुरड्यांचा जीव वाचवला आहे. पुणे शहरात मागील काही महिन्यात अक्षरशः माणुसकीचा काळिमा फासणाऱ्या घटना घडल्या आहेत. विवाहबाह्य संबंधातून जन्मलेल्या चिमुकल्या जीवांना कचर्याच्या ढिगार्यात फेकून देत अनेकांनी आपली सुटका करून घेतली. जन्मदात्यांनी टाकून दिलेल्या १३ अर्भकांचे प्राण पोलिसांनी सामाजिक संस्थांमुळे वाचले आहेत.
पुणे शहरात मागील दोन वर्षात विविध ठिकाणी २२ नवजात अर्भके रस्त्याच्या कडेला, कचरा कुंडीत, झाडाझुडपांत जन्मदात्यांनीच फेकून दिल्याचे आढळून आले होते. प्रामुख्याने अविवाहित मातृत्व, बलात्कार, किशोरवयीन संबंध किंवा विवाहबाह्य संबंधांतून जन्मलेले मुल फेकून देत जन्मदात्यानी जबाबदारी झटकली. मात्र, संवेदनशिलतेची जाण असलेले नागरिक, पोलिस आणि सामाजिक संस्थांनी वेळीच त्यांच्यावर उपचार केल्याने चिमुकल्याना नवे जीवन मिळाले आहे.
हडपसरमध्ये कुत्र्यावर विकृताचा अनैसर्गिक अत्याचार; अमानुष कृत्याने खळबळ
’अनैतिक’ गर्भधारणा, आणि त्यातून जन्मलेली ही अर्भके फक्त ’ओझं’ मानली जाते. काही घटनांमध्ये मुली असल्यामुळे त्या रस्त्यावर टाकल्याचेही समोर आले आहे. ’मुलगी म्हणजे ओझं’, अशी अजूनही जिवंत असलेली मानसिकता निष्पाप जीवांचा गळा घोटत आहे. कुठे भटके श्वान नवजातांचे लचके तोडण्याचा प्रयत्न करत होती. तर काही ठिकाणी त्यांच्या शरीरावर ओरबाडण्याचा प्रयत्न करत झाला. दरम्यान, ११ नवजात बालिका आणि १० बालक शहरातील विविध भागात मिळून आली आहेत. त्यापैकी ८ नवजातांचा मृत्यू झाला आहे. तर १३ जणांना नवे आयुष्य मिळाले आहे.
२२ अर्भकापैंकी १३ बाळं संगोपनासाठी समाजिक संस्थात दाखल
उघड्यावर मिळून आलेल्या २२ अर्भकापैंकी १३ बाळं संगोपनासाठी समाजिक संस्थात दाखल केली आहेत. तर ८ जणांना जन्मताच जगाचा निरोप घ्यावा लागला. २०२०३ मध्ये ११, २०२४ मध्ये ७, तर २०२५ मध्ये आतापर्यंत ४ नवजात अर्भके सापडली आहेत.
– मुलींच्या जन्माबाबतची मागास मानसिकता
– अविवाहित मातांकडून इभ्रतीपोटी निर्णय
– गरिबी आणि जबाबदारी झटकण्याची वृत्ती
– लैंगिक शिक्षणाचा अभाव, गर्भधारणा
– लैंगिक अत्याचारातून जन्मलेली मुले
– अनैतिक संबंधातून,प्रेमसंबंधातून जन्मलेली मुले
– शारिरीक व्यंगाचे कारण
म्हणून हे करा
– बालजीवन पेटी सारखी यंत्रणा सर्व जिल्ह्यांत सक्तीने लागू करावी, जिथे आई-बाप आपलं बाळ गुप्तपणे सोपवू शकतील.
– गुप्त गर्भधारणा समुपदेशन केंद्राची निर्मिती व मार्गदर्शनासाठी हेल्पलाईन
– दत्तक प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुलभ हवी
– लैंगिक शिक्षण आणि समाज प्रबोधन
– फेकलेल्या बाळांच्या घटनांवर तात्काळ कारवाई
जन्मदात्यानी नवजात बालकांची खेचलेली पहिली श्वास घेण्याची संधी त्यांना परत द्यायला हवी. आई-बाप नकोसे वाटले, पण समाज आधार देईल हा विश्वास रुजवायला हवा. शासकीय पातळीवर देखील ठोस पावले उचलने आवश्यक आहे.– अॅड. निखिल कुलकर्णी, दिवाणी व फौजदारीतील वकील.