मस्साजोग येथील महावितरण विद्युत केंद्रातील घटना
marathinews24.com
बीड – वीजेचा धक्का बसून २८ वर्षीय महावितरण कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी ( दि. १८) सहा वाजण्याच्या सुमारास बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग महावितरण विद्युत केंद्रात घडली आहे. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी गेल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याला वीजेचा धक्का बसला आहे. त्यामुळे मस्साजोगसह परिसरात शोककळा पसरली आहे. अमोल लव्हाळे (वय २८ वर्षे रा. मस्साजोग ता. केज) असे ठार झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.
अमोल लव्हाळे हे अविवाहित होते. ते गावचा वीजपुरवठा सुरू करण्यासाठी गेले असता, त्यांना धक्का बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेने संपूर्ण गावामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. विद्युत शॉक लागून मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांला शव्हविच्छदनासाठी केज येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहे. अमोल हा गरीब कुटुंबातील मुलगा होता. त्याच्या पश्चात आई आहे. त्याच्या कुटुंबात फक्त आई आहे. वडील नसल्यामुळे घरातील उदरनिर्वाह करण्यासाठी कोणी नसल्यामुळे महावितरण प्रशासनाने अमोल लव्हाळे यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्याची मागणी मस्साजोगसह पंचक्रोशीतील मित्र परिवाराने केली आहे. अमोल लव्हाळे यांच्या पार्थिवावर मस्साजोग येथे शुक्रवारी (दि. १९) सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.





















