कौटुंबिक वादाचा अतिरेक: चुलत भावाकडून घर पटवून देण्याचा धक्कादायक प्रकार
Marathinews24.com
पुणे – कौटुंबिक वादातून घराच्या दरवाज्यावर पेट्रोल ओतून पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली. नगर रस्त्यावरील केसनंद गावात ही घटना घडली. नवनाथ नंदकुमार हरगुडे (वय ३८, रा. केसनंद, नगर रस्ता) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. प्रशांत हरगुडे (वय ३८) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नवनाथ आणि फिर्यादी प्रशांत चुलतभाऊ आहेत. शनिवारी (५ एप्रिल) कौटुंबिक वादातून नवनाथने पत्नीला मारहाण केली होती. दोघांमधील वाद सोडविताना नवनाथ आणि प्रशांत यांच्यात झटापट झाली. प्रशांतने नवनाथला मारहाण केली होती. नवनाथ प्रशांतवर चिडला होता. रविवारी मध्यरात्री प्रशांत आणि कुटुंबीय गाढ झोपेत होते. त्यावेळी नवनाथने बाटलीत पेट्रोल आणून दरवाज्यावर ओतले. प्रशांत याच्या घराचा दरवाजा पेटवून दिला.
दरवाजाने पेट घेतल्यानंतर गाढ झोपेत असलेले प्रशांत आणि कुटुंबीय जागे झाले. दरवाज्यावर पाणी ओतून आग आटोक्यात आणल्याने दुर्घटना टळली. त्यानंतर प्रशांतने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी नवनाथला अटक केली असून, पोलीस उपनिरीक्षक मनोज बागल तपास करत आहेत.