हडपसरमधील मांजरी भागात घडली घटना
marathinews24.com
पुणे – रेल्वेच्या धडकेत ३ युवकांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी ( दि. १६) रात्री हडपसरमधील मांजरी भागात घडली आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेले तीन युवक मांजरी भागातील रहिवासी आहेत. प्रथमेश नितीन तिंडे (वय १७), तन्मय महेंद्र तुपे (वय १९), तुषार विजय शिंदे (वय १९, तिघे रा. गोपाळपट्टी, मांजरी बुद्रुक, हडपसर) अशी मृत्युमुखी पडलेल्या युवकांची नावे आहेत.
नवले पुल परिसरात पुन्हा अपघात – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथमेश, तन्मय, तुषार हे रविवारी (१६ नोव्हेंबर) रात्री सव्वाआठच्या सुमारास मांजरी भागातील लोहमार्ग ओलांडत होते. त्यावेळी पुणे-दौंड या मार्गावरील रेल्वेगाडीने (डेमू) तिघांना धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच हडपसर पोलीस ठाण्यातील कर्मचारी, तसेच लोहमार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तिघांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला होता, अशी माहिती हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांनी दिली.
अपघात नेमका कसा झाला,याची निश्चित माहिती मिळाली नाही. मांजरी भागातील लोहमार्ग परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. अपघातात तीन युवक मृत्युमुखी पडल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांनी तिघांच्या रक्ताचे नमुने ताब्यात घेतले आहेत. वैद्यकीय तपासणीसाठी रक्ताचे नमुने पाठविण्यात आले आहेत. मांजरी परिसरातील लोहमार्ग नागरिक ओलांडून पलीकडे जातात. अपघातात मरण पावलेल्या तीन युवकांना लोहमार्ग ओलांडताना रेल्वेने धडक दिल्याची शक्यता आहे. अंधारात त्यांना समोरुन येणारी रेल्वेगाडी दिसली नसावी. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे. प्रत्यक्षदर्शींकडे चौकशी करण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे.























