राज्य सरकाकडून धोरण निश्चीत
marathinews24.com
पुणे- राज्यभरातील विविध कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या बंदीवानांच्या हक्क्कासाठी आता सरकारने दखल घेतली आहे. त्यानुसार आता बंदीवानांच्या कोठडीतील मृत्यूप्रकरणी भरपाईचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. संपुर्ण राज्यभरातील कारागृहात प्रशासनाकडून संबंधित धोरणाची अमलबजावणी केली जाणार आहे. त्यामुळे भविष्यात अशाप्रकारच्या घटना घडल्यास बंदीवानांच्या नातलगांना याचा आर्थिंक फायदा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
अभिजीत बिचुकले पुणे पोलिसांच्या तावडीत – सविस्तर बातमी
राज्यातील विविध कारागृहांमध्ये कोठडीत असलेल्या बंदीवानाचा मृत्यू अनैसर्गिक कारणांमुळे झाल्यास, त्याच्या वारसांना राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाच्या सूचनेनुसार भरपाई देण्याच्या धोरणास शासनाने मंजुरी दिली आहे. धोरणानुसार कारागृहामध्ये काम करताना झालेल्या अपघातामुळे, वैद्यकीय अधिकार्यांच्या निष्काळजीपणामुळे, कारागृह कर्मचार्यांच्या मारहाणीमुळे किंवा बंदीवानांच्या आपापसातील भांडणात एखाद्या बंद्याचा मृत्यू झाल्याचे चौकशीतून सिद्ध झाल्यास, कैद्याच्या वारसांना ५ लाख भरपाई दिली जाणार आहे. तसेच तुरुंगवासातील आत्महत्येच्या प्रकरणात बंदीवानांच्या वारसांना १ लाख भरपाई देण्यात दिली जाणार आहे. जर एखाद्या बंदीवानाचा नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्यू झाल्यास त्याला मात्र शासनाच्या धोरणानुसार भरपाई मिळणार आहे.
बंदीवानांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी संबंधित कारागृह अधीक्षकांनी प्राथमिक चौकशी सादर करणे आवश्यक आहे. त्यासोबतच संबंधित बंद्याचे शवविच्छेदन, पंचनामा, वैद्यकीय अहवाल, न्यायालयीन व जिल्हाधिकार्यांचा तपासासह कागदपत्रांसह अहवाल प्रादेशिक विभाग प्रमुखांकडे सादर करावा लागेल. त्यानंतर प्रकरणाची सखोल चौकशी करून अंतिम प्रस्ताव अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा यांच्याकडे सादर केला जाईल. त्यांच्या शिफारशीनंतर याप्रकरणी शासन स्तरावर निर्णय घेतला जाणार आहे. त्यानंतर संबंधित बंदीवानांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई दिली जाणार आहे. दरम्यान, एखाद्या कारागृहात बंदीवानाचा मृत्यू प्रकरणात दोषी आढळणार्या अधिकार्यांवर कठोर कारवाई करण्याचाही निर्णय मंत्रीमंडळाने घेतला आहे.
तर या नातलगांना नाही मिळणार लाभ
विविध कारागृहातंर्गत शिक्षा भोगत असलेल्या बंदीवानांचा वार्धक्यामुळे मृत्यू झाल्यास त्याचा आर्थिक लाभ नातेवाईकांना मिळणार नसल्याचे धोरण राज्य शासनाने निश्चीत केले आहे. त्यासोबतच बंदीवानाचा दीर्घ आजार, कारागृहातून पलायन करताना झालेला अपघातात, जामीनावर असताना, किंवा उपचार नाकारल्याने मृत्यू झाल्यास त्याबाबतीत कोणतीही नुकसान भरपाई संबंधित बंद्याच्या नातेवाईकाला दिली जाणार नसल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बंदीवानांच्या मृत्यू प्रकरणात धोरण निश्चीतीमुळे काही प्रकरणातील गरीब नातलगांना निश्चीत फायदा होणार आहे.
बंदीवानांच्या आरोग्याबाबत प्रशासनाकडून विशेष काळजी
कारागृहातील बंद्याच्या आरोग्याबाबत प्रशासनाकडून विशेष काळजी घेतली जात आहे. प्रामुख्याने बंद्यांना झोपण्यासाठी स्वच्छ जागा, कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीन, विविध आजारासंदर्भात तातडीचे निदान व्हावे, यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची व्हिजीट, कारागृहातंर्गत विविध योजनांद्वारे राज्यभरातील बंद्यांची काळजी घेतली जात आहे. अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक डॉ. सुहास वारके, पोलीस महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांच्या मार्गदर्शनाखाली बंदीवानांसाठी नाविण्यपुर्ण उपक्रमांची अमलबजावणी केली जात आहे.