Breking News
बारामतीतील वादळग्रस्त भागातील जनजीवन पूर्ववत करापोलिसांच्या हाती लागू नको, सतत ठिकाणे बदलत राहाराज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुमारे दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्तपुण्यात गॅस सिलिंडरच्या स्फोटात कुटूंबातील तिघे ठार‘पीएलएफएस आणि ‘एएसयुएसई’विभागीय प्रशिक्षण कार्यशाळेला तळेगाव दाभाडे येथे सुरुवातवारजेतील लॉजवर गुन्हे शाखेचा छापमौजमजेसाठी सायकल चोरी; अल्पवयीन ताब्यातयेरवडा कारागृह परिसरात ११ हजार वृक्ष लागवड उपक्रमाचा शुभारंभविद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणीसायबर चोरट्यांकडून ज्येष्ठाची ६२ लाखांची फसवणूक

मराठी भाषा गौरव दिन विशेष लेख 

‘माझा मराठाचि बोलु कौतुकें’

marathinews24.com

पुणे – वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिन महाराष्ट्रात ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो. हा दिवस केवळ स्मरणाचा नसून आत्मपरीक्षणाचा आणि आत्मगौरवाचा आहे. “माझा मराठाचि बोलु कौतुकें” या संतवचनाच्या प्रेरणेने मराठी भाषेच्या ऐतिहासिक परंपरेचा, साहित्यिक वैभवाचा आणि अभिजात स्वरूपाचा सुसंगत आढावा मराठी भाषा गौरव दिनाच्या पार्श्वभूमीवर…!!

‘फुला’तून उलगडणार मुरळीची संघर्षमय कथा – सविस्तर बातमी

मराठी भाषेची मुळे प्राचीन महाराष्ट्री प्राकृतमध्ये आढळतात. सातवाहन कालखंडात प्रतिष्ठान नगरी म्हणजेच आजचे पैठण हे राजकीय व सांस्कृतिक केंद्र होते. त्या काळात महाराष्ट्री प्राकृत ही लोकव्यवहार, प्रशासन आणि साहित्यनिर्मितीची प्रभावी भाषा होती. सातवाहन राजा राजा हाल यांनी संकलित केलेली गाथा सप्तशती ही काव्यरचना या भाषिक परंपरेचा भक्कम पुरावा मानली जाते. सुमारे २७८ कवींच्या आर्या या ग्रंथात समाविष्ट असून, इ.स.पूर्व दुसरे शतक ते इ.स. दुसरे शतक या कालखंडातील सामाजिक, सांस्कृतिक आणि भावविश्वाचे प्रतिबिंब त्यातून दिसते. प्रेम, निसर्ग, ग्रामजीवन आणि स्त्री-पुरुष संबंधांचे सूक्ष्म दर्शन घडवणारी ही रचना मराठीच्या भावविश्वाची आद्य पायाभरणी ठरते.

महाराष्ट्री प्राकृत ते अपभ्रंश आणि पुढे प्राचीन मराठी असा भाषिक विकासक्रम दिसतो. शिलालेख, ताम्रपट आणि दानपत्रांतून मराठीच्या आरंभीच्या स्वरूपाचे पुरावे मिळतात. यादवकालीन प्रशासनात मराठीचा वापर वाढला. याच काळात मराठीला लोकभाषेचे बळ लाभले आणि ती ज्ञानप्रसाराचे प्रभावी माध्यम बनली.

संतपरंपरेत संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेला तात्त्विक अधिष्ठान दिले. ‘भावार्थदीपिका’ अर्थात ज्ञानेश्वरी आणि ‘अमृतानुभव’ या ग्रंथांमधून त्यांनी संस्कृतातील तत्त्वज्ञान लोकभाषेत आणले. “माझा मराठाचि बोलु कौतुकें, परि अमृतातेहि पैजा जिंके” या त्यांच्या वचनातून मराठीच्या अभिव्यक्तीशक्तीवरील अढळ विश्वास प्रकट होतो. त्यानंतर संत नामदेव महाराज , संत एकनाथ महाराज , संत तुकाराम महाराज यांच्यासह वारकरी संप्रदायातील सर्व संत परंपरेमुळे अभंग-ओव्यांतून मराठीची अध्यात्मिक व सामाजिक परंपरा अधिक व्यापक झाली. भक्ती चळवळीने मराठीला लोकमान्यता, लोकसंवाद आणि लोकशक्तीचे माध्यम बनवले.

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात मराठी ही केवळ लोकभाषा न ठेवता ती राज्यकारभाराची भाषा बनवली. त्यातूनच राजव्यवहार कोष, पत्रव्यवहार, आज्ञापत्रे यांमधून मराठीची प्रशासकीय ताकद अधोरेखित झाली. स्वराज्य स्थापनेच्या प्रक्रियेत मराठीने स्वाभिमानाचे रूप धारण केले. पुढे पेशवेकाळात आणि नंतरच्या काळात शिक्षणव्यवस्थेत मराठीला नवीन आव्हाने आणि संधी लाभल्या. मुद्रणयंत्राच्या आगमनाने वृत्तपत्रे, ग्रंथप्रकाशन आणि आधुनिक साहित्यप्रकार विकसित झाले. आधुनिक काळात कादंबरी, नाटक, कविता, ललितलेखन, समीक्षा, पत्रकारिता या सर्व क्षेत्रांत मराठीने स्वतंत्र ओळख निर्माण केली.

वि. वा. शिरवाडकर यांनी “परभाषेच्या कचेरीत आपली भाषा साहेबासारखी वागवा, पण आपल्या घरात ती आईसारखी जपली पाहिजे,” असे सांगत भाषिक स्वाभिमानाची जाणीव करून दिली. साने गुरुजी यांनी मातृभाषेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत तिचे ऋण मान्य करण्याचा संदेश दिला. या विचारांतून मराठी ही केवळ व्यवहाराची नव्हे तर संस्कारांची भाषा आहे, हे स्पष्ट होते.

अलीकडे केंद्र सरकार कडून मराठी भाषेला प्रदान करण्यात आलेला ‘अभिजात भाषा’ दर्जा हा तिच्या प्राचीन परंपरेचा आणि समृद्ध साहित्यसंपदेचा अधिकृत सन्मान आहे. दोन हजार वर्षांहून अधिक प्राचीन परंपरा, स्वतंत्र साहित्यनिर्मिती, शास्त्रीय ग्रंथसंपदा आणि सततचा भाषिक विकास या सर्व निकषांवर मराठी समर्थपणे उभी आहे. या मान्यतेमुळे संशोधन, शोधनिबंध, विद्यापीठीय अभ्यासक्रम आणि प्राचीन हस्तलिखितांचे जतन यांना नवे बळ मिळणार आहे.

आजच्या डिजिटल युगात मराठीसमोर नवी आव्हाने उभी आहेत. तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, संगणकीय भाषा प्रक्रिया, ई-ग्रंथालये, सामाजिक माध्यमे या सर्व क्षेत्रांत मराठीची उपस्थिती वाढवणे गरजेचे आहे. प्रशासन, विज्ञान-तंत्रज्ञान, उद्योगव्यवहार आणि उच्च शिक्षण यांमध्ये मराठीचा सशक्त वापर होणे ही काळाची गरज आहे, त्या दृष्टीने शासनही प्रयत्नशील आहे . तरुण पिढीत वाचनसंस्कृती, लेखनसंवेदना आणि भाषिक अभिमान रुजवणे ही आपली सर्वांची सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.

मराठी भाषा गौरव दिन हा केवळ औपचारिक उत्सव नसून सांस्कृतिक स्व-ओळखीचा उत्सव आहे. मराठी ही महाराष्ट्राच्या अस्मितेचा आधारस्तंभ आहे; तिच्या शब्दांत इतिहासाचा ठसा, संतवाङ्मयाची करुणा, स्वराज्याचा स्वाभिमान आणि आधुनिकतेची झेप सामावलेली आहे.
“माझा मराठाचि बोलु कौतुकें” ही भावना केवळ उच्चारात न राहता कृतीत उतरावी, मराठीचा वापर वाढावा, तिचे संशोधन-संवर्धन व्हावे आणि ती जागतिक पातळीवर अभिमानाने उभी राहावी…हीच मराठी भाषा गौरव दिनानिमित्त अपेक्षा व्यक्त करू या….!!

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×