सुर-संगीताने रंगली ‘बुद्ध धम्म संध्या’

‘विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती’तर्फे बुद्ध पौर्णिमेनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम

marathinews24.com

पुणे – बुद्ध पौर्णिमेनिमित्त आयोजित ‘बुद्ध धम्म संध्या’ हा सांस्कृतिक कार्यक्रम सुरेल गीतांनी आणि उत्स्फूर्त प्रतिसादाने रंगला. “बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि”, “माझा भीमराया”, “प्रथम नमो गौतमा”, “सोनियाची उगवली सकाळ”, “भीमा तुला प्रणाम कोटी कोटी”, “जरी झाला बॅरिस्टर”, “आकाश मोजतो आम्ही” अशा गीतांद्वारे तथागत गौतम बुद्धांच्या शांतीचा संदेश आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समानतेच्या विचारांचा सुरेल आविष्कार सादर करण्यात आला.

सुट्टीला गावी चाललाय, पण घरांच्या सुरक्षिततेचे काय ? – सविस्तर बातमी

‘विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणे’तर्फे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ‘तथागत गौतम बुद्ध विपश्यना विहार’ येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गायक आणि वादकांनी बुद्ध व आंबेडकर यांच्या कार्याची महती सांगणारी गीते सादर करत रसिकांना मंत्रमुग्ध केले.

यावेळी आयोजक, पुण्याचे उपमहापौर परशुराम वाडेकर, माजी उपमहापौर सुनीता वाडेकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संरक्षणशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. विजय खरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

झी युवा ‘संगीत सम्राट’ फेम तसेच ‘कलर्स मराठी सुर नवा ध्यास नवा’ या कार्यक्रमातील गायक संतोष मोरे, निखिल मधाळे आणि चेतन चोपडे यांनी आपल्या सुरेल सादरीकरणातून बुद्ध आणि आंबेडकर यांच्या कार्याचा वेध घेतला. प्रेक्षकांनीही टाळ्यांच्या कडकडाटात कलाकारांना भरभरून दाद दिली.

यावेळी “मेरा भीम जबरदस्त”, “त्रिसरणाची मंगलवारी”, “भिमाच्या तेजोगोल डोळ्यांची दृष्टी”, “रमाई” आदी गीतांसह बुद्ध विचार आणि धम्म आचरणावर आधारित मार्गदर्शक गीते सादर करण्यात आली. तसेच वामनदादा कर्डक आणि प्रतापसिंह बोदडे यांच्या प्रबोधनात्मक भीमगीतांचाही जलसा रंगला.

कार्यक्रमात विजेंद्र कुंभार (पियानो), सनी कणकवार (ऑक्टोपॅड), विनोद थोरात, निखिल लांडगे आणि कृष्णा सहवासी (तबला) या वादकांनी गायकांना उत्कृष्ट साथसंगत देत कार्यक्रमाची शोभा वाढवली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×