देशात बिकट स्थिती निर्माण होऊ नये यासाठी काळजी घेण्याचे आवाहन
marathinews24.com
पुणे – देशातील विविध राज्यांच्या निवडणूकीच्या काळात देशाच्या नेतृत्वाला गांभीर्य नव्हते. निकालानंतर त्यांनी जनतेला आवाहन का केले. त्यानंतर आता अनेक राजकीय नेत्यांकडून इंधन बचतीसाठी वाहनांचा ताफा कमी केला जात आहे. एक दोन दिवसांच्या बचतीने काही होणार नाही, इंधन बचतीमध्ये सातत्य ठेवावे, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार)अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी दिला आहे. देशात सध्या गंभीर स्थिती असून पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी अशी मागणीही पवारांनी पत्रकार परिषदेत केली आहे. यावेळी प्रवक्ते अंकुश काकडे, विकास लवांडे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले आवाहन गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. तसेच आवाहनानुसार वाहनांचा ताफा सोडणार्यांनी दिखावा करू नये, त्यामध्ये सातत्य दाखवावे. देशात सध्या गंभीर स्थिती असून पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी. त्या बैठकीला पंतप्रधानांनी स्वतः उपस्थित राहावे, असेही आवाहन त्यांनी केले आहे. दरम्यान, निवडणुकीच्या काळात सत्ताधार्यांना इंधन बचतीचा विचार का केला नाही? इंधन बचतीचा निर्णय घ्यायला इतका वेळ का लागला? निकालानंतर हे आवाहन का करावे लागले, असा सवालही पवार यांनी उपस्थित केला आहे.
देशात परिस्थिती गंभीर असल्याचे चित्र
पंतप्रधांन नरेंद्र मोदी यांनी जे काही आवाहन केले आहे, त्यावरून परिस्थिती गंभीर आहे असे दिसते. त्याची सर्वत्र चर्चा सुरू असून, पंतप्रधानांच्या आवाहनाची सर्वांनी नोंद घ्यावी. यापूर्वीही देश अशा परिस्थितीला सामोरे गेलेला आहे. दरम्यान, प्रशासनाच्या खर्चात बचत करण्याचे अनेक पर्याय आहेत. त्यावर काम करावे. दरम्यान, मंत्र्यांच्या ताफ्यात १७ गाड्या कशाला हव्यात? त्या गाड्या कमी करुन ७ ते ८ वर आणले जात आहे. माझ्या ताफ्यात फक्त तीनच गाड्या असून, माझ्या ताफ्यात बदल करण्याची विनंती मी केली आहे. मात्र, सुरक्षिततेच्या कारणास्तव विशेष सुरक्षा विभागाकडून तसे केले जात नसल्याचे पवारांनी स्पष्ट केले.
ते रोज दुचाकीवरून गेले तरच गांभीर्य, मुख्यमंत्र्यांना टोला
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रालयात दुचाकीवर जाताना पाहाण्यात आले. मुख्यमंत्री उद्यापासून रोज मंत्रालयात दुचाकीवरून गेले, तरच लोक गांभीर्याने घेतील, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लावला. तसेच हा वाहनांचा कमी ताफा केलेला दिखावा किती दिवस टिकेल हे पाहावे लागेल. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी देशाचे विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांच्याबाबतीत केलेले विधान मला पटलेले नाही, असेही पवार यांनी स्पष्ट केले.
नीटचा पेपर फुटल्याने विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात
यापुर्वीही नीट परीक्षेचा पेपर फुटला होता. आताही आवश्यक ती काळजी घेतली नसल्याने हा पेपर फुटला आहे. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात गेले आहे.
निकाल लागताच जनतेला आवाहन
रुपयाची किंमत डॉलरच्या तुलनेत खाली येत आहे. ती का येत आहे? याचा विचार केला पाहिजे. इराणचा काही प्रश्न असल्यामुळे त्याचा काही दुष्परिणाम आहे. तेवढाच असेल तर मग हा निर्णय युद्ध सुरु झाल्यानंतरच का घेतला नाही? ज्यादिवशी निकाल जाहीर झाला, त्या दिवसापासून हे सगळे निर्णय घेतले. निवडणुकीची प्रक्रिया चालू होती त्या काळात देशाच्या नेतृत्वाने कधीही जनतेत जागरुकता निर्माण करावी, असा विचार आला नाही. सोमानाथ मंदिराला ७५ वर्षे पूर्ण झाले, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी गेले. त्याबाबत तक्रार करायचं कारण नाही. पण एअर फोर्सचे ६ विमाने हे वरुन त्या कार्यक्रमात सहभागी झाले. प्रश्न असा की, परिस्थिती गंभीर आहे. गांभीर्य सर्वांनी दाखवले पाहिजे’, असाही टोला पवारांनी लगावला.
चलनाची किंमत घसरू न देण्यासाठी हा पर्याय
सोने खरेदी करु नका असे सांगणे याचा अर्थ एकच आहे, आपल्या चलनाची किंमत आहे, ती घसरु द्यायची नाही हा त्यामागचा हेतू आहे. तो चुकीचा आहे, असे मी म्हणत नाही. एका बाजूने आपण हे म्हणायचे आणि दुसर्या बाजूला खर्च कमी करण्याकडे दुर्लक्ष करायचे, या दोन्ही गोष्टी विरोधी आहेत.






















