शासनाने अविनाश पाठकांना सेवेतून केले निलंबीत
marathinews24.com
बीड (अनंत जाधव) – सोलापूर -धूळे राष्ट्रीय महामार्गावरील कथित भूसंपादनातील तब्बल ७२ कोटी रुपयांच्या भ्रष्टाचार मावेजा घोटाळा प्रकरणातील आरोपी न्यायालयीन कोठडीत असलेल्या बीड जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या अडचणीत आणखीन वाढ झाली आहे.
काळू धरणवासियांच्या संघर्षाला पाठबळ – सविस्तर बातमी
भूसंपादन भ्रष्टाचार घोटाळा प्रकरणात झालेली अटक आणि त्यानंतर मिळालेली कोठडी यामुळे राज्य शासनाने अविनाश पाठकांवर अखेर निलंबनाची कारवाई केली आहे.बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कथित भूसंपादन भ्रष्टाचार मावेजा घोटाळा प्रकरणी दाखल गुन्ह्यात ७ मे रोजी बीडचे माजी जिल्हाधिकारी म्हणून राहिलेल्या अविनाश पाठक यांना लातूर येथून अटक करण्यात आली होती. बीडच्या न्यायालयाने सुरुवातीला अविनाश पाठक यांना पोलीस कोठडी सुनावली तर सध्या पाठक न्यायालयीन कोठडीमध्ये असताना आता सनदी अधिकाऱ्याला कोठडी सुनावण्यात आल्याने राज्य शासनाने पुढील कारवाई केली असून अविनाश पाठक यांच्या निलंबनाचे आदेश दि.२२ मे दिले आहेत.
हे निलंबन अटकेच्या तारखेपासून असणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले असून निलंबनकाळात अविनाश पाठक यांचे मुख्यालय बीड असणार आहे. या कारवाईमुळे पाठक यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे.
धाराशिव प्रकरणातही पाठक, करमरकर अडचणीत येणार आहे.
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ च्या चौपदरीकरणासाठी झालेल्या भुसंपादनात कोट्यवधीं रूपयांचा गैरव्यवहार केल्याचा गंभीर आरोप धाराशिवचे तात्कालिन अप्पर जिल्हाधिकारी अविनाश पाठक आणि भुसंपादन अधिकारी शिल्पा करमरकर यांच्यावर करण्यात आला आहे. याप्रकरणी छत्रपती संभाजीनगर उच न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून न्यायालयाने पोलिसांच्या भुमिकेवर तीव्र शब्दात ताशेरे ओढले आहेत. तसेच या प्रकरणाच्या चौकशीचा अहवाल न्यायालयात सादर करण्याचे निर्देश धाराशिव पोलिसांना दिले आहेत.





















