कारवाईच्या मागणीसाठी दळवी कुटुंबियांचे ठिय्या आंदोलन; पोलीसांकडून तक्रार घेण्यास टाळाटाळ
marathinews24.com
बीड : अनंत जाधव – बीड शहर पुन्हा एकदा धक्कादायक हत्याकांडाने हादरले आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बालेपीर परिसरात अवैध दारू दुकानात काम करणाऱ्या एका तरुणाची अमानुषपणे हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. उमेश नवनाथ दळवी असे मृत तरुणाचे नाव असून, त्याच्यावर करण्यात आलेली मारहाण ही मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणा सारखीच असल्याचा आरोप नातेवाईकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून तणावाचे वातावरण निर्माण होऊन संतापाची लाट पसरली आहे.
पुण्यात ऍसिड टाकून वाहनांचे नुकसान – सविस्तर बातमी
या घटनेने पुन्हा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. उमेश दळवी याचे मारहाणीतील गंभीर अवस्थेतील फोटो सध्या सोशलमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या खळबळजनक घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून, आरोपींना तात्काळ अटक करून कठोरात कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी पीडित कुटुंबीयांनी दि.२४ मे रविवार रोजी सकाळपासून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत आरोपींवर कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा इशारा कुटुंबीयांनी पोलिसांना दिला आहे. त्यामुळे उमेश नवनाथ दळवी याचा मृतदेह सध्या बीडच्या शासकीय रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. या हत्येनंतर बीडमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये भीती आणि संताप व्यक्त होत आहे.
काय म्हणाली मयत तरुणाची पत्नी
मयत उमेश दळवी या तरुणाच्या पत्नीने प्रसारमाध्यमांशी बोलताना धक्कादायक माहिती दिली. “माझा नवरा त्या दारूच्या दुकानावर मागील २ वर्षांपासून काम करत होता. दुकानाच्या ठिकाणावरून त्यांनी 8 वाजता मला फोन करून सांगितलं की, मला मारहाण करणार आहेत, त्यानंतर मी घरामध्ये एकटीच होती. त्यांना क्षुल्लक गोष्टीवरून मारहाण केली. मला याआधीही त्यांनी असं सांगितलं होतं’ असं मयत उमेशच्या पत्नीने सांगितलं.
“मी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यासाठी गेली होती, पण त्यांनी तक्रार दाखल करून दिली नाही. जर धंद्यात काही घोळ झाला असेल तसं सांगायला पाहिजे होतं. आम्ही पैसे परत केले असते. पण, माझ्या नवऱ्याचा जीव का घेतला? आमचे सगळे पैसे घेतले, शेत जमिनीचे पैसे घेतले, माझी सर्व प्रॉपर्टी या लोकांनी घेतले आहे, असा आरोपही मयत तरुणाची पत्नीने केला आहे.
मारेकऱ्यांना सोडू नका म्हणत पत्नीला अश्रू अनावर
“ज्या दिवशी ही घटना घडली, त्या दिवशी रात्री तीन वाजता मला फोन करून सांगितलं की, तुझ्या नवऱ्याची तब्येत बिघडली आहे त्याला दवाखान्यात आणलं आहे, असं देखील सांगितलं मात्र यांनी माझ्या नवऱ्याचा जीव घेतला आहे, त्यांना सोडू नका, लाला शेठ आणि सुनील शेठ अशी यांची नाव आहे, त्यांना अजिबात सोडू नका, असं म्हणत उमेश दळवीच्या पत्नीला अश्रू अनावर झाले.
पोलीसांकडून तक्रार घेण्यास टाळाटाळ
बीड मध्ये पुन्हा पोलीसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चोवीस तास झाले तरी हत्या झालेल्या पीडित दळवी कुटुंबाची पोलीसांकडून तक्रार घेतली जात नाही. नेमकी तक्रार घेण्यास टाळाटाळ का? बीड मध्ये कायदा सुव्यवस्था आहे की नाही? बीड आहे की बिहार?असे संतप्त सवाल नागरिकांतून विचारले जात आहेत. तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री सुमित्रा पवार यांनी या हत्या प्रकरणाकडे लक्ष केंद्रित करून पीडित दळवी कुटुंबाला न्याय मिळवून देण्याची मागणी सर्व स्तरातून होत आहे.





















