कात्रजमध्ये कोयताधारी टोळक्याचा व्हिडिओ व्हायरल
marathinews24.com
पुणे – शहरातील कायदा सुव्यवस्था वठणीवर आणण्यासाठी हॉटेल व्यावसायिकांना वेठीस धरणार्या पुणे पोलिसांच्या नाकावर टिच्चून टोळक्याने कोयते बाहेर काढून फिरवले आहेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, संबंधित कोयतेधारी कात्रज गावातील नवीन वसाहतीत असल्याची शक्यता आहे. दरम्यान, प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढवलेला बंदोबस्त, नियमबाह्य दुकाने बंद करण्याचा सपाटा, रस्त्यावर पोलिसांचा फौजफाटा असतानाही टोळक्याने कोयते मिरवल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या दिखाउ कामगिरीवर नागरिकांची नाराजी व्यक्त केली आहे.
शासकीय आदेश धुडकाविणाऱ्या शिक्षकाविरुद्ध गुन्हा – सविस्तर बातमी
दुचाकीस्वार दोनजण मोठमोठे कोयते घेउन कात्रजमधील नवीन वसाहतीत फिरत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली असून, कोयताधारी टोळक्याच्या धास्तीने चिंता व्यक्त करण्यात आली. एकीकडे पुण्यातील नागरिकांच्या सुरक्षिततेचे कारण देत पोलिसांनी नियमांवर बोट ठेवल्याने हॉटेल व्यावसायिकांना फटका बसला आहे. त्यातच कोयताधारी टोळक्याकडून भलेमोठे कोयते हातात घेउन परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे अशा आरोपींविरूद्ध कारवाई करण्याचे सोडून पोलिसांनी आता हॉटेल व्यावसायिकांना टारगेट केल्याचा आरोप व्यावसायिकांनी केला आहे.
कोयताधारी टोळके पोलिसांवर शिरजोर
नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी दादागिरी करीत कोयताधारी टोळक्याने मागील १५ दिवसांपासून विविध भागात राडा घातला आहे. प्रामुख्याने वर्दळीचा भाग असलेल्या बाह्यवळण मार्गावर रिक्षाचालकावरील कोयत्याने वार, कोथरूडमध्ये वैमनस्यातून कोयत्याने वार, सहकारनगरमध्ये अक्षय काळेवर गोळीबार आणि कोयता हल्ल्याच्या घटना ताज्या आहेत. असे असतानाही कात्रज परिसरात टोळक्याने पुन्हा एकदा कोयते नाचवले आहेत. त्यामुळे कोयताधारी पोलिसांवर शिरजोर झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
गुन्हे शाखेच्या पथकांना मरगळ
खबर्याचे नेटवर्क असलेल्या पुणे गुन्हे शाखेच्या बहुतांश पथकांना मगरळ आली आहे. प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी छोट्या आणि किरकोळ कारवाया करीत टारगेट पुर्ण करण्यास प्राधान्य दिले जात आहे. सातत्याने कोयताधारी टोळक्याचा राडा थोपवण्यासाठी गुन्हे शाखेकडे उतारा नाही का, अधिकारी -कर्मचारी-युनीट प्रमुखांमध्ये सुसंवाद नाही का, कोयताधारी टोळक्यांना पोलीस हलक्यात घेत आहेत का, बांग्लादेशी नागरिकांविरूद्ध असलेल्या मोहिमेप्रमाणे कोयताधार्याविरूद्ध कारवाई का होत नाही, असे असंख्य प्रश्न उपस्थित होत आहेत.





















