पाषाणमधील सूस रस्ता, पुणे-सोलापूर रस्ता, तसेच येरवड्यातील गोल्फ क्लब परिसरात अपघाताच्या घडल्या घटना
marathinews24.com
पुणे – शहरात वेगवेगळ्या अपघातांत तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. पाषाणमधील सूस रस्ता, पुणे-सोलापूर रस्ता, तसेच येरवड्यातील गोल्फ क्लब परिसरात अपघाताच्या घटना घडल्या. पाषाण-सूस रस्त्यावर भरधाव दुचाकी गतिरोधकावरुन घसरल्याने पदपथावर आदळून सहप्रवासी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघातात दुचाकीस्वार तरुणासह दाेघे जण जखमी झाले.
इलेक्ट्रीक दुकानातून वायरीचे बंडल, रोकड चोरी – सविस्तर बातमी
प्रसाद सुनील शेकडे (वय २०, रा. बोईसर, जि. पालघर) असे मृत्युमुखी पडलेल्या सहप्रवाशाचे नाव आहे. अपघातात दुचाकीस्वार सक्षम चिंतेश्वर बोराडे (वय १९, रा बोराडे गल्ली, जि. बीड), अमित धोडिंबा साळुंखे (वय २०, रा. म्हाळस जवळी, जि. बीड) गंभीर जखमी झाले. याबाबत पोलीस हवालदार सुनील सूर्यवंशी यांनी बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार सक्षम, सहप्रवासी प्रसाद, अमित हे २२ मे रोजी पहाटे सव्वा चारच्या सुमारास पाषाण परिसरातील सूस रस्त्याने निघाले होते. ब्रह्मकुमारी राजयोग केंद्रासमोर भरधाव दुचाकीस्वार सक्षम याचे नियंत्रण सुटले. दुचाकी गतिरोधकावरुन घसरल्याने पदपथावर आदळली. दुचाकीस्वार सक्षम, प्रसाद, अमित हे जखमी झाले. गंभीर जखमी झालेल्या तिघांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांदरम्यान प्रसाद याचा मृत्यू झाला. भरधाव दुचाकी चालवून अपघातास जबाबदार ठरल्या प्रकरणी दुचाकीस्वार सक्षम याच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक मांढरे तपास करत आहेत.
येरवड्यातील गोल्फ क्लब रस्त्यावर वाहनाच्या धडकेत रिक्षाचालकाचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. विजय घोरपडे (वय ६०, रा. नेताजी सुभाषचंद्र बोस शाळेजवळ, येरवडा) असे मृत्युमुखी पडलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. या प्रकरणी एका वाहनचालकाविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला. याबाबत घोरपडे यांची मुलगी सायली (वय ३१) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ मे रोजी दुपारी घोरपडे यांची रिक्षा येरवड्यातील गोल्फ क्लब रस्त्यावर बंद पडली. रिक्षा बंद पडल्याने ते रिक्षातून उतरले. त्या वेळी पाठीमागून आलेल्या भरधाव वाहनाने रस्त्यावर थांबलेल्या घोरपडे यांना धडक दिली. अपघातानंतर वाहन चालक पसार झाला. गंभीर जखमी झालेल्या घोरपडे यांचा उपचारांदरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. सहायक पोलीस निरीक्षक जराड तपास करत आहेत.
पुणे-सोलापूर रस्त्यावर भरधाव वाहनाच्या धडकेत पादचारी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाची ओळख पटलेली नाही. या प्रकरणी वाहन चालकाविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस शिपाई अतुल रायबोले यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. २२ मे रोजी दुपारी पावणेदोनच्या सुमारास पादचारी तरुण पुणे-सोलापूर रस्त्यावरुन निघाला होता. लोणी काळभोर परिसरातील बोरकर वस्ती परिसरात रस्ता ओलांडणाऱ्या तरुणाला भरधाव वाहनाने धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या पादचारी तरुणाचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. सहायक पोलीस निरीक्षक बोराटे तपास करत आहेत.





















