सासरच्या चौघांविरुद्ध तक्रार
marathinews24.com
पुणे – महिलेला वजनावरून सतत टोमणे मारणे, वजन कमी करण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यास दबाव टाकणे, तसेच दिवसभर उपाशी ठेवून मानसिक आणि शारीरिक छळ केल्याप्रकरणी कॅम्प परिसरातील एका विवाहितेने पतीसह चौघांविरुद्ध लष्कर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी संबंधितांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.
पुण्यातील पोर्शे अपघातातील आरोपींचा डान्स व्हायरल- सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर २०२५ ते एप्रिल २०२६ या कालावधीत विवाहितेला सासरी वारंवार त्रास दिला जात होता. तिच्या वजनावरून सतत टोमणे मारत “वजन कमी करण्यासाठी ऑपरेशन कर” तसेच “त्याचा खर्च तुझ्या वडिलांनी करावा” असे सांगून वाद घातले जात असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तक्रारदार महिलेला अनेकदा घरात एकटे ठेवून खाण्यासाठी काहीही न देणे, तिच्याशी क्रूरपणे वागणे तसेच मानसिक दबाव टाकण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पतीने वेळोवेळी मारहाण आणि शिवीगाळ केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. याशिवाय सासू आणि नणंदेकडूनही मारहाण करून माहेराहून पैसे आणण्याची मागणी केली जात होती. सततच्या मानसिक आणि शारीरिक छळामुळे त्रस्त झालेल्या महिलेने अखेर पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणाचा पुढील तपास लष्कर पोलिस करत आहेत.





















