खराडातील खांदेवनगरातील घटना; चिमुरडीसह तिची आई जखमी
marathinews24.com
पुणे – नवीन गॅसची टॉकी जोडताना वेगाने गॅसगळती होउन झालेल्या स्फोटात एकाच कुटूंबातील कर्त्या मुलासह तिघांचा मृत्यू झाला आहे. तर ६ वर्षीय मुलीसह एक महिला जखमी झाले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. ही दुर्घटना शुक्रवारी (दि. ५) सकाळी नउच्या सुमारास खराडातील खांदवेनगरात घडली आहे. गॅस टाकीच्या स्फोटामुळे मोठा आवाज झाल्याने आजूबाजूच्या रहिवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच खराडी पोलिसांसह अग्निशमक दलाच्या जवानांनी धाव घेत बचावकार्य राबवून जखमींना रूग्णालयात दाखल केले.
वारजेतील लॉजवर गुन्हे शाखेचा छापा; अल्पवयीन मुलीसह महिलेची सुटका – सविस्तर बातमी
विष्णू मुंजाजी गित्ते (वय ८२) वृंदाविनी विष्णू गित्ते (वय ६०) पांडुरंग विष्णू गित्ते (वय ३५, सर्व रा. खांदवेनगर ) अशी स्फोटात गंभीर जखमी होउन ठार झालेल्यांची नावे आहेत. तर निहारिका पांडुरंग गीत (वय ६) आणि राजश्री पांडुरंग गीत्ते (वय २५) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.
अग्निशमक दलाने दिलेल्या माहितीनुसार, गित्ते कुटूंबिय खराडातील खांदवेनगरात राहायला असून, शुक्रवारी त्यांच्या घरातील गॅसची टाकी संपली होती. त्यामुळे नवीन टाकी जोडत असताना नउ वाजता गॅसगळती झाली. त्यामुळे स्फोट झाल्यामुळे घरातील तिघेही गंभीररित्या जखमी झाले. दरम्यान, स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाने खराडी, धानोरी, येरवडा येथून तीन वाहने रवाना करीत बचावकार्य राबवले. तिघांनाही रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान पांडुरंग गित्ते यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. त्यानंतर काही वेळाने विष्णू गित्ते, वृंदावनी गित्ते यांचाही मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. दरम्यान, अग्निशमक दलाने आग पुर्णपणे विझवून कुलींग करून काम पुर्ण केले आहे.
गॅस टॉकीचा सेफ्टी लॉक काढल्यानंतर गळती
गॅसटाकीचा सेफ्टी लॉक काढल्यानंतर घरात वेगाने गॅसगळती सुरू झाली. त्यानंतर अवघ्या काही मिनिटात गॅस संपुर्ण परिसरात पसरला गेला. त्यामुळे स्फोट होउन तिघे गंभीररित्या जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, संबंधित गॅस कंपनीची टाकी लिकेज कशी झाली, त्यामध्ये काही दोष होता का, याप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे.
आगीत घराचेही मोठे नुकसान
आगीमध्ये पुर्ण हॉल जळाला असून, त्यामध्ये फर्निचर, टिव्ही, वायरिंगचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच स्फोटामुळे बाथरूम, टाँयलेटचे दरवाजे, गिझर जळाले असून किचनमधील फर्निचर, काही प्रमाणात झळा बसल्या आहेत. फ्लॅटमध्ये धुरामुळे सर्व भिंती काळ्या झाल्या आहेत. घरामधील एलपीजी सिलेंडर संपला असता नवीन सिलेंडर लावताना सिलेंडर लिकेज होत पसरल्यामुळे मोठा धमाका झाल्याने दुर्घटना झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
चिमुरडी अन आईचे दैव बलवत्तर
गॅसच्या स्फोटात गित्ते कुटूंबातील कर्ता पांडुरंग यांच्यासह त्यांच्या आई-वडिलांचा मृत्यू झाल्यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे. कुटूंबातील ६ वर्षीय मुलगी निहारिका आणि तिची आई राजश्री सुदैवाने गंभीररित्या जखमी झाल्या नाहीत. त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू असून, दोघींचीही प्रकृत्ती स्थित असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.






















