राजीनाम्याच्या चर्चांना पूर्णविराम; अयोध्या राम मंदिर ट्रस्टच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याची स्वामी गोविंददेव गिरी महाराजांची भूमिका
marathinews24.com
पुणे – Swami Govinddev Giri Maharaj : श्री राम मंदिर ट्रस्ट अयोध्याचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी आपण राजीनामा देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. माझ्या राजीनाम्यासंदर्भात खोडसाळपणे बातम्या पसरवल्या जात आहेत. तसा विचारही माझ्या मनात नसून, ट्रस्ट सोबत उभे राहण्याची हीच वेळ आहे. याप्रकरणी गुन्हेगार कुणीही असो, त्यांना पकडून कठोर कारवाई केली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत केली आहे.
स्वामी गोविंददेव गिरी महाराज म्हणाले, माझ्या राजीनाम्याची बातमी काल सगळीकडे पसरली होती. मी छत्रपती शिवाजी महाराजांचा अनुयायी असून, मैदान सोडून पळणारा नाही. माझ्या नावावर संपूर्ण जीवनात एकही विट नाही, काहीही संपत्ती माझ्या नावावर नाही. फक्त एक बँक अकाउंट आहे. ट्रस्टच्या कोषाध्यक्ष पदाचा राजीनामा मी द्यावा, असे मी कधी मनातही आणले नाही. अनेकांचे मला फोन आले होते. मी राजीनामा देणार आहे. असा विचारही माझ्या मनात नाही. ट्रस्ट सोबत उभे राहण्याची हीच वेळ आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
एआयटीच्या चौकशीवर समाधानी, गुन्हेगार पकडले पाहिजे
संघर्षावेळी ट्रस्ट सोबत उभा राहणे आवश्यक असून, एसआयटीच्या चौकशीवर मी समाधानी आहे. दरम्यान, चंपातराय यांनी जो राजीनामा दिला आहे, तो त्यांच्या हलगर्जीपणामुळे दिला आहे, त्यांनी दिलेला राजीनामा हा स्वच्छेने दिलेला आहे. जमाखर्चाची जबाबदारी मी स्वीकारत आहे. मी कुठेही प्रभाव टाकत नाही. कुणाला ही फोन केलेला नाही. गुन्हेगार कुणीही असो, त्यांना पकडून कठोर कारवाई केली पाहिजे, अशी मागणीही स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी केली आहे.
३ कोटींच्या आसपास रक्कम असावी
एसबीआय बँकेने त्यांचे निरीक्षक ठेवायला हवे होते. सीसीटीव्हीच्या निगराणीत देणगीची रक्कम मोजली जात होती. पण, बाजूला जाऊन ही रक्कम लंपास करण्यात आली. ही आकडेवारी अव्वाच्या सव्वा सांगितली जात आहे. मात्र, ३ कोटींच्या आसपास रक्कम असावी, असा माझा अंदाज आहे. हिशोबाची तपासणी योग्यच सुरू आहे. चंपातराय यांनी अनिल मिश्रा यांच्यावर जबाबदारी सोपवली होती. माझी यात भूमिका नसून, निधी चोरीचा राजकीय संबंध नाही. त्या फक्त गप्पा आहेत. एसआयटी चौकशी करत आहे, त्यामुळे त्यात आम्ही हस्तक्षेप करणार नसल्याचे स्वामी गोविंदगिरी महाराज यांनी सांगितले.






















