चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारातील तिकिट विक्री केंद्रातील कर्मचाऱ्यावर चाकूने वार करुन चोरट्यांनी रोकड लुटल्याची धक्कादायक घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. चोरट्यांनी चाकूने वार केल्याने रेल्वे कर्मचारी जखमी झाला असून, पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे. चोरट्यांनी रेल्वे कर्मचाऱ्याच्या गळ्यातील सोनसाखळी, मोबाइल, तसेच तिकिट विक्रीतून जमा झालेली २६ हजार रुपयांच रोकड असा ४ लाख ९१ हजार रुपयांचा मुद्देमाल लुटून नेला. केल्विन सोलोमन मायला (वय २९, रा. धायरकर काॅलनी, मुंढवा) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याबाबत केल्विन यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अल्पवयीन मुलीवर अत्याचारानंतर हत्या; पुणे जिल्ह्यातील पिंपळवंडी गावातील घटना – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केल्विन पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारातील तिकिट केंद्रात नियुक्तीस आहेत. मंगळवारी (१८ ऑगस्ट) मध्यरात्री एकच्या सुमारास केल्विन हे तिकिट विक्री केंद्रात जमा झालेली रोकड घेऊन मुख्य कार्यालयात जमा करण्यासाठी निघाले होते. त्या वेळी दोन चोरट्यांनी त्यांना तिकिट विक्री केंद्राजवळ अडवले. त्यांच्या गळ्याला चाकू लावून तिकिट विक्री केंद्रात जाण्यास सांगितले. त्यांना मारहाण केली. केल्विन यांनी चोरट्यांना विरोध केला. झटापटीत चोरट्यांनी त्यांच्या हातावर चाकूने वार केला.
चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील पाच तोळ्यांची सोनसाखळी, खिशातील २६ हजार ६८५ रुपये, दोन मोबाइल असा चार लाख ९१ हजार रुपयांचा मुद्देमाल लुटला. चोरट्यांनी जखमी अवस्थेतील केल्विन यांचे हातपाय बांधले. त्यांच्या तोंडात रुमाल कोंबला. त्यामुळे क्लेविन यांना आरडाओरडा करता आला नाही. जखमी अवस्थेतील केल्विन यांना तिकिट विक्री केंद्रात पडल्याचे पाहून प्रवाशांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तिकिट विक्री केंद्राजवळ धाव घेतली. जखमी अवस्थेतील केल्विन यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यात येत असून, पोलिसांनी पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारतील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आहे. पोलीस उपनिरीक्षक गणेश चव्हाण तपास करत आहेत.
पीएमपी प्रवासी महिलेचे १ लाखांचे मंगळसूत्र चोरले
पीएमपी प्रवासी महिलेच्या गळ्यातील एक लाखांचे मंगळसूत्र चोरट्यांनी लांबविल्याची घटना महापालिका भवन बसस्थानक परिसरात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
याबाबत एका महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला सांगवी परिसरात राहायला आहे. २ ऑगस्ट रोजी महिला आणि त्यांचे वडील खराडीला निघाले होते. महापालिका भवन परिसरातील थांब्यावर ते थांबले होते. बसमध्ये प्रवेश करताना चोरट्याने महिलेच्या गळ्यातील एक लाख रुपयांचे मंगळसूत्र चोरले. बसमध्ये प्रवेश केल्यानंतर महिलेच्या वडिलांच्या लक्षात मंगळसूत्र चोरीचा प्रकार आला. त्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस हवालदार शेख तपास करत आहेत.





















