पुण्याच्या वाहतूक प्रश्नावर सल्लागार समितीत मंथन
marathinews24.com
पुणे – शहरातील वाढती वाहतूक कोंडी, अपुऱ्या सार्वजनिक वाहतूक सुविधा, वाढती वाहनसंख्या आणि रस्त्यांवरील अनधिकृत अतिक्रमणाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्थेबाबत शहर वाहतूक सल्लागार समितीच्या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासोबतच खासगी वाहनांची संख्या कमी करणे, पादचाऱ्यांसाठी सुविधा निर्माण करणे आणि वाहतूक पोलिसांचे प्रभावी नियमन आवश्यक असल्याचे मत बैठकीत व्यक्त करण्यात आले.
‘रील फॉर सॉईल ॲण्ड वॉटर कन्झर्वेशन’ स्पर्धेत सहभाग घ्यावा-चेतन कलशेट्टी – सविस्तर बातमी
माजी खासदार वंदना चव्हाण म्हणाल्या, सार्वजनिक वाहतूक सुधारायची की खासगी वाहनांना महत्त्व द्यायचे, याचा विचार करण्याची गरज आहे. केवळ ११ टक्के नागरिक सार्वजनिक वाहतुकीचा वापर करतात, ही बाब अत्यंत कमी आहे. शहरात दररोज सुमारे ३ हजार ६०० वाहनांची भर पडत असून, ही चिंताजनक बाब आहे.शहरात एफएसआयची खैरात वाढत चालली आहे. ती थांबवावी लागणार आहे. अन्यथा वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. वाहतूक कोंडीमध्ये महापालिकेचा मोठा सहभाग आहे. वाहतूक समस्येबाबत बोलताना पादचाऱ्यांचा विचारच केला जात नाही. अनेक रस्त्यांवर आणि चौकांमध्ये रस्ता ओलांडण्यासाठी योग्य सुविधा उपलब्ध नाहीत. अनेक चौकांमध्ये वाहनचालक आपापल्या पद्धतीने वाट काढत असल्याचेही त्यांनी सांगितले.
माजी महापौर अंकुश काकडे म्हणाले, पीएमपीकडे बसची संख्या कमी आहे. महापालिकेच्या वतीने वाहतूक पोलिसांना देण्यात आलेल्या १५० वॉर्डनवर कोणाचेही नियंत्रण नाही. ते काय काम करतात, कुठे थांबतात, याची माहिती ना महापालिकेला आहे, ना पोलिसांना. अनधिकृत टपऱ्या आणि हातगाड्यांचा विचार केला असता, २०१७ ते २०२६ या कालावधीत त्यांची संख्या १०० पटीने वाढली आहे. २०१७ नेमक्या किती टपऱ्या व हातगाड्या होत्या आणि २०२६ मध्ये किती आहेत याची आकडेवारी जाहीर करायला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
दीड महिन्यापूर्वी वाहतूक समस्येबाबत स्थानिक पोलिस आणि नागरिकांची समिती स्थापन करणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, अद्याप ही समिती स्थापन झालेली नाही. तसेच शहरात येणाऱ्या व्हीआयपींमुळे पोलिसांवर ताण येत असल्याचे त्यांनी सांगितले.
मोहन जोशी म्हणाले, वाहतूक पोलिसांनी पुढील १५ दिवस केवळ वाहतुकीचे नियमन करावे, कारवाई करू नये, असे आदेश पोलिस आयुक्तांनी दिले आहेत. वाहतूक पोलिसांची कारवाईची मशिन दिवाळीपर्यंत बंद ठेवायला हवी. तसेच वाहतूक पोलिस प्रत्येक चौकात उभे असायला हवेत.दीड वर्षापूर्वी शहरातील ३३ रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाल्यास त्याचा परिणाम संपूर्ण शहरावर होत असल्याचे सांगितले होते. त्यावर काम केले असते, तर आज शहरभर वाहतूक कोंडी झाली नसती. मेट्रो स्थानकांवर पार्किंगची व्यवस्था नाही. पीएमपी बसची संख्याही पुरेशी नसल्याचे त्यांनी सांगितले.





















