१८ ते २५ सप्टेंबरदरम्यान गर्दीनुसार वाहतूक बदल
marathinews24.com
पुणे – गणेशोत्सवातील देखावे आणि रोषणाई पाहण्यासाठी शहराच्या मध्यवर्ती भागात होणारी गर्दी लक्षात घेऊन पुणे वाहतूक शाखेने वाहतुकीत बदल केले आहेत Pune Traffic Changes : गणेशोत्सवात पुण्यात मध्यवर्ती भागातील रस्ते वाहतुकीस बंद. त्यानुसार १८ सप्टेंबरपासून २५ सप्टेंबरपर्यंत विविध प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक बंद करण्यात येणार असून, काही मार्गांवर दररोज सायंकाळी पाच वाजल्यापासून गर्दी संपेपर्यंत आवश्यकतेनुसार चारचाकी, रिक्षा आणि दुचाकींसह सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद केला जाणार आहे. फायरब्रिगेड, पोलिस वाहने आणि रुग्णवाहिका यांसारख्या अत्यावश्यक सेवेतील वाहनांना या निर्बंधातून वगळण्यात आले आहे.
लक्ष्मी रस्त्यावर निर्बंध
हमजेखान चौक ते सेवासदन चौक या लक्ष्मी रस्त्यावरील वाहतूक १८ सप्टेंबरपासून बंद राहणार आहे. वाहनचालकांनी डुल्या मारुती चौकातून उजवीकडे वळून दारूवाला पूलमार्गे इच्छितस्थळी जावे. तसेच हमजेखान चौकातून डावीकडे वळून महाराणा प्रताप रस्त्याने घोरपडे पेठ पोलिस चौकीमार्गे शंकरशेठ रस्त्याचा वापर करता येईल.
सेवासदन चौक ते टिळक चौक या लक्ष्मी रस्त्यावर १८ ते २५ सप्टेंबरदरम्यान दररोज सायंकाळी पाच वाजल्यापासून गर्दी संपेपर्यंत आवश्यकतेनुसार वाहतूक बंद केली जाणार आहे. बाजीराव रस्त्याकडून येणाऱ्या वाहनांनी पुरम चौकातून टिळक रस्त्याने इच्छितस्थळी जावे. शनिपार चौकाकडून येणाऱ्या वाहनांनी चौकातून डावीकडे वळून पुढे जावे.
शिवाजी रस्त्यावर वाहतूक वळविणार
गाडगीळ पुतळा ते रामेश्वर चौक या शिवाजी रस्त्यावरील वाहतूक बंद राहणार आहे. शिवाजीनगरहून स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनांनी स. गो. बर्वे चौक–जंगली महाराज रस्ता–टिळक चौक–टिळक रस्ता किंवा शास्त्री रस्त्याचा वापर करावा. तसेच सिमला चौक–कामगार पुतळा चौक–शाहीर अमर शेख चौक–बोल्हाई चौक–नेहरू रस्तामार्गे स्वारगेटकडे जाता येईल.
रामेश्वर चौक ते जेधे चौक या मार्गावरही १८ ते २५ सप्टेंबरदरम्यान सायंकाळी पाच वाजल्यापासून गर्दी संपेपर्यंत वाहतूक बंद राहणार आहे. या मार्गासाठी कुंभारवेस चौक–पवळे चौक–साततोटी चौक–योजना हॉटेल–देवजीबाबा चौक–हमजेखान चौक–महाराणा प्रताप रस्ता–घोरपडे पेठ पोलिस चौकी–घोरपडे पेठ उद्यान–झगडे आळी–शंकरशेठ रस्ता हा पर्यायी मार्ग देण्यात आला आहे.
बाजीराव रस्ता, केळकर रस्त्यावर बदल
पुरम चौक ते आप्पा बळवंत चौक या बाजीराव रस्त्यावरील वाहतूक बंद राहणार आहे. वाहनचालकांनी पुरम चौकातून टिळक रस्त्याने टिळक चौकात जाऊन उजवीकडे वळावे आणि केळकर रस्त्याने आप्पा बळवंत चौकाकडे जावे.
याशिवाय टेलिफोन भवन ते पुरम चौक या दरम्यान सध्या असलेली एकेरी वाहतूक तात्पुरती शिथील करून या कालावधीत दुहेरी वाहतूक करण्यात येणार आहे.




















